छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शहरात पार्किंगची सोय करण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने आता वाहनांची उचलेगिरी सुरू केली आहे. या उचलेगिरीचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क शुक्रवारी (६ जून) महापालिका अधिकाऱ्यांवर नकली नोटा उधळल्या. त्यामुळे गोंधळ उडाला. शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला उभी असणारी वाहने उचलणे बंद करावे, अशी मागणी मनसैनिकांनी करत घोषणाजी केली.

शहरात कुठेही पार्किंगची व्यवस्था महापालिकेने केलेली नाही. रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले तरी महापालिकेचे पथक उचलून नेत आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिक येतात तेव्हा त्यांचा अर्धा जीव वाहनाकडे असतो. प्रत्येक वाहनाला दोन हजार रुपये दंड आकारला जात आहे. दंडाच्या नावाखाली महापालिका लूट करत असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भीक लागली आहे, असा आरोप मनसैनिकांनी केला. महापालिका प्रवेशद्वारासमोर व प्रशासकांच्या दालनासमोर त्यांनी आंदोलन केले. आंदोलकांचे निवेदन शहर अभियंता फारुख खान यांनी स्वीकारले. पैशांसाठी महापालिका अवैध वसुली करत असल्याचा आरोप करत मनसैनिकांनी अधिकाऱ्यांवर नकली नोटा उधळल्या आणि घोषणाबाजी केली, तेव्हा मोठा गोंधळ उडाला. मनसेचे चंदू नवपूते, गणेश साळुंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. आधी पार्किंगची व्यवस्था करा, नंतरच वाहनांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. कारवाई सुरूच राहिली तर अधिकाऱ्यांच्या वाहनांच्या काचा फोडू, असा इशाराही त्यांनी दिला.