पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : वर्षभरापूर्वीच आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्त्वात ठाकरे गटात दाखल झालेले सचिन घायाळ यांना उद्धव ठाकरे यांनी थेट उपनेते केले. त्यांच्यावर जालना आणि पैठणची जबाबदारी सोपवली. अवघा पक्ष फुटल्यानंतर, संदिपान भुमरे हे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन शिंदे गटात दाखल झालेले असताना त्या संकटात निष्ठावंतांनी ठाकरेंचा झेंडा खाली पडू दिला नाही. ते निष्ठेच्या फळाच्या अपेक्षेत असताना त्यांच्यापैकी कुणालाही संधी न देता घायाळ यांना थेट उपनेते केल्याने निष्ठावंत उपरेच ठरल्याची भावना पैठणमध्ये व्यक्त होत आहे.
विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपमधून आलेल्यांना तिकिटांचे वाटप झाले, त्याच पद्धतीने मानाच्या पदांचे वाटपही सध्या सुरू असल्याने निष्ठावंतांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. साखर कारखानदारी, खतनिर्मिती आदी क्षेत्रात घायाळ कार्यरत आहेत. श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे ते सर्वेसर्वा आहेत. त्यांना ठाकरे गटात आणण्यासाठी प्रामुख्याने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रयत्न केले. मात्र नंतर त्यांची आ. दानवे यांच्याशी जवळीक वाढली. अवघ्या चाळीशीत असलेले घायाळ आता ठाकरे गटाचे उपनेते झाले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत पैठणमधून त्यांना विलास भुमरे यांच्याविरोधात निवडणूक लढायची होती. मात्र पक्षाने दत्ता गोर्डे यांना उमेदवारी दिली.
उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते. त्यावेळी स्वतः दानवे यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती. त्यानंतरही त्यांनी ठाकरे गटाचा उमेदवार जिंकून यावा, यासाठी किती प्रयत्न केले, याबद्दल अजूनही निष्ठावंत कार्यकर्त्यांना शंका आहे. पैठणमधील पराभव जिव्हारी लागल्याने उद्धव ठाकरे यांनी घायाळांना उपनेते केल्याचे सांगण्यात येते. अशावेळी बंडखोरविरुद्ध निष्ठावंत असा सामना रंगवायला हरकत नव्हती. पण जी चूक विधानसभा निवडणुकीत ठाकरेंनी केली, तीच पद देतानाही केल्याची चर्चा होत आहे. संदिपान भुमरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवणाऱ्या प्रकाश वानोळे, सुरेश शेळके, अजय परळकर, लालू चिखले, राजू चौके, एम. जी. हाडे, राजू कुलकर्णी, मनोज पेरे, शुभम पिवळ या निष्ठावंतांना असे कोणते मोठे पद देण्याचे ठाकरेंच्या मनात का आले नसावे, असाही प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, घायाळ यांनी नव्या जबाबदारीबद्दल म्हटले आहे, की उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या जबाबदारीचे सोने करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करणार असून, विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. ठाकरे गट वाढीसाठी अहोरात्र झटणार असल्याचे ते म्हणाले.