छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : उस्मानपुऱ्यातील भाजप कार्यालयासमोर रंगलेल्या पॉलिटिकल ड्राम्याने काही काळ सर्वांचेच मनोरंजन केले. ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल ठाकरे गटाने केला, तर ‘लबाड लांडगं ढोंग करतंय…’ असा टोला भाजपने लगावला… ५ जूनला आ. अंबादास दानवे यांनी थेट भाजप कार्यालयावर केलेला हा ‘सर्जिकल स्ट्राइक’ मंत्री अतुल सावे यांनी खिलाडूवृत्तीने घेतला असला तरी आ. संजय केणेकर यांच्या मात्र प्रचंड जिव्हारी लागला आहे. हिंमत असेल तर आ. दानवेंनी आता शिंदे गट आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. मात्र दानवेंनी त्यांना प्रत्युत्तर देताना आम्ही त्यांना गद्दार मानतो, त्यांच्याकडे निवेदन देण्याचा प्रश्नच नाही, असे म्हणत आव्हानाला धुडकावून लावले. दुसरीकडे मंत्री सावे यांनी केणेकरांच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. त्यामुळे राज्याच्या विरोधी पक्षनेत्याचे निवेदन स्वीकारले त्यात काहीच गैर नाही, असे ते म्हणाले.
ठाकरे गटाचे ‘क्या हुआ तेरा वादा’ हे आंदोलन १२ जूनपर्यंत चालणार आहे. ५ जून आ. अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भाजप कार्यालयावर जाऊन घोषणाबाजी करत ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी दोन्ही पक्षांत रंगलेली घोषणाबाजी मजेशीर ठरली. घोषणा देताना कार्यकर्तेही हसत होते. त्यामुळे हे आंदोलन होते, की ड्रामा हे कळायला मार्ग नव्हता. त्यानंतर या आंदोलनावरून आ. संजय केणेकर यांनी आ. दानवे यांना आव्हान दिले आहे. मी असतो तर आ. दानवेंना भाजप कार्यालयाची पायरी चढू दिली नसती. त्यांनी सरकारच्या विरोधातील निवेदन शासन, प्रशासनाला द्यायचे. याप्रकरणी मी पोलीस आयुक्तांशी बोलून तक्रार दिली आहे. ही दानवेंची दादागिरी आहे. यातून शहरातील राजकीय वातावरण खराब होईल. त्याला दानवे जबाबदार असतील. भाजप कार्यालयात येण्याची त्यांची काहीही गरज नव्हती. हिंमत असेल तर त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट, शिंदेसेनेच्या कार्यालयात जाऊन निवेदन देऊन दाखवावे, असे केणेकर म्हणाले. आ. दानवेंच्या आंदोलनावेळी केणेकर शहरात नव्हते. शुक्रवारी ते शहरात आले.
सावेंनी केणेकरांच्या आव्हानातील हवा काढली…
मंत्री अतुल सावे यांनी आ. केणेकरांच्या आव्हानातील हवा काढली आहे. पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचे निवेदन स्वीकारले. त्यात काहीच गैर नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होऊन ११ वर्षे पूर्ण झाल्याचा कार्यक्रम भाजप कार्यालयात होता. त्याचवेळी दानवेही निवेदन घेऊन आले. तेव्हा त्यांना बोलावून घेतले. जनतेचे प्रश्न घेऊन कुणी कार्यालयात येत असेल तर त्याचे स्वागतच आहे. माझ्याकडे रस्त्यावर जरी कुणी प्रश्न घेऊन आला तरी मी त्याची दखल घेईन. कुणालाही परत पाठवणार नाही, असे सावे यांनी स्पष्ट केले.
दानवे म्हणाले, ते आमच्यासाठी गद्दार…
शिंदे गटाचे कार्यालय किंवा पालकमंत्री संजय शिरसाट यांना आम्ही गद्दार मानतो. त्यांच्याकडे निवेदन देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही त्यांना मोजतही नाही, असा टोला आ. अंबादास दानवे यांनी लगावत केणेकरांनी आम्हाला भाजप कार्यालयात का येऊ दिले, हा प्रश्न मंत्री अतुल सावे आणि शहराध्यक्ष किशोर शितोळे यांना विचारावा. त्यांनी मला उपदेश करण्याऐवजी त्यांना उपदेश करावा, असे दानवे म्हणाले.