छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हॉटेल व्हिट्स, महिलेने मुलावर केलेले आरोप या गोष्टीतून थोडी उसंत मिळत नाही तोच, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. शेंद्रा एमआयडीसी परिसरात ‘केनिया डिस्टलरीज प्रायव्हेट लिमिटेड’ या खासगी कंपनीला तब्बल २१ हजार चौरस फूट जागा देण्यात आली असून ही कंपनी पालकमंत्र्यांचे सुपूत्राच्या मालकीची असल्याचा खळबळजनक दावा माजी खासदार व एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. ही जागा ट्रक टर्मिनलसाठी राखीव होती, मात्र ते आरक्षण हटवून मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीला दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत जलील म्हणाले, की फूड प्रॉडक्ट निर्मितीच्या नावाखाली कंपनीला जागा दिली आहे. प्रत्यक्षात तिथे अल्कोहोल युनिट सुरू करण्यात येणार आहे. हा प्रकार गंभीर असून, यामागे शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचा संशय नाकारता येणार नाही, असा आरोप त्यांनी केला. शासनाने या प्रकरणात चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही जलील यांनी केली आहे. ही जागा ६ कोटी रुपयांची असल्याचे सांगून जलील म्हणाले, की कागदपत्रांमध्ये म्हटले आहे की, त्यांनी सुरू करायच्या कंपनीसाठी दारू तयार करण्यास लागणारे काही केमिकल्स लागणार आहेत. पण कंपनी रजिस्ट्रेशनच्या कागदपत्रांमध्ये वेगळेच फूड प्रॉडक्ट्स दाखवले आहेत. स्पिरिट किंवा अल्कोहोल फूड प्रॉडक्टमध्ये कुठे आणि कसे वापरले जाते, हे समजत नाही, असे जलील म्हणाले.