पैठण (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर पतसंस्थांच्या घोटाळ्यांनी चर्चेत असते. आता नवा घोटाळा समोर आला आहे. सूर्यतेज अर्बन पैठण मल्टिपल पतसंस्थेने ठेवीदारांना गंडा घातल्याचे समोर आले असून, पैठण तालुक्यातील नांदर-दावरवाडी येथील शाखेत गुंतवणूक करणाऱ्या मुरलीधर राजाराम काळे (रा. नांदेड) यांच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, चेअरमनसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वर जाधव, नागेश जाधव, रवींद्र घाडगे आणि नारायण सोरमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अनेक ठेवीदार तक्रारीसाठी समोर येत आहे. थेरगाव येथील किशोर नेहाले आणि दिलीप नेहाले यांनीही तक्रार केली आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांनी पुराव्यासह तक्रार द्यावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत आणि पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते यांनी केले आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राम बारहाते करत आहेत. पैठण न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.
ठेवीदारांच्या तक्रारीनुसार, पाथरवाला येथील ज्ञानेश्वर नारायण जाधव याने वर्षभरापूर्वी नांदर-दावरवाडी फाट्यावर ही पतसंस्था सुरू केली. नागेश नारायण जाधव, रवींद्र अर्जुन घाडगे, नारायण भिकाजी सोरमारे हेही पतसंस्थेच्या कारभारात सहभागी होते. त्यांनी ग्राहकांना १२ टक्के व्याजदराचे आमिष दाखवून मुदत ठेवी स्वीकारल्या. अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी पिग्मी खाती उघडून बचत केली. नांदर येथील मुरलीधर राजाराम काळे यांचा मार्च २०२४ मध्ये अपघात झाला. उपचारासाठी त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या एकूण पाच लाख २९ हजार रुपयांची रक्कम मागितली असता संचालकांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे काळे यांनी न्यायालयात अर्ज केला. १७ मे २०२५ रोजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी एस. आर. कणकदंडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी शोध घेतला असता पतसंस्थेला टाळे लागलेले असल्याचे समोर आले. सर्व घोटाळेबाज फरारी आहेत.