सुप्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश जवळजवळ २० वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे. मात्र अजूनही तो योग्य संधीच्या शोधात आहे. सात खून माफ, न्यू यॉर्क, जेल, इंदू सरकार, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्याने नीलने त्याच्या संघर्षाची आणि वारंवार मिळत असलेल्या नकाराची कहाणी सांगितली. यामुळे तो अनेक वेळा खचला होता, परंतु त्याने हार मानली नाही…
प्रश्न : इतक्या वर्षांच्या कारकिर्दीत तू अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. तुझी अभिनयाची आवड कशी टिकवून ठेवली? आजोबा, प्रसिद्ध गायक मुकेश आणि वडील, प्रसिद्ध गायक नितीन मुकेश यांच्यापेक्षा वेगळी वाट निवडून अभिनयाचा मार्ग का निवडला?
नील : माफ करा, पण मी १३ वर्षांचा असताना काम करायला सुरुवात केली. आज मी ४३ वर्षांचा आहे, म्हणजे माझ्या कारकिर्दीला आता ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. माझ्या वडिलांनी (नितीन मुकेश) मला स्पष्टपणे सांगितले होते, की कोणताही निर्माता तुला सहजासहजी लाँच करणार नाही. मी तुझ्यासाठी कुणाकडे शब्द टाकणार नाही. तुला कठोर परिश्रम करावे लागतील. मी अनुपम खेर यांच्या अकादमीत काम केले, यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर, प्रत्येक चित्रपट कार्यालयाचे दरवाजे ठोठावण्यापासून ते स्टुडिओला भेट देण्यापर्यंत, मला लोकांना हे पटवून द्यावे लागले की मी मुकेश आणि नितीन मुकेश यांच्या संगीत घराण्यातील असूनही, मी अभिनय करू शकतो. मी त्यासाठी कठोर आणि प्रामाणिकपणे काम करत आहे. मी तेव्हाही संधीच्या शोधात भटकत होतो आणि आजही भटकत आहे. प्रत्येक चित्रपटानंतर शोध पुन्हा सुरू होतो. माझ्या जवळजवळ २० वर्षांच्या कारकिर्दीत, मी डझनभराहून अधिक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकांसोबत आणि अनेक महान कलाकारांसोबत काम केले आहे. त्यांच्याकडून सतत काहीतरी शिकत आलो आहे. माझ्या संघर्षाची कहाणी सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहत नाही. इतक्या दीर्घ संघर्षानंतरही नील हार मानत नाही, तेव्हा आपणही हार मानू नये, अशी प्रेरणा लोकांनी माझ्याकडून घ्यावी अशी माझी इच्छा आहे.
प्रश्न : संघर्षाची अशी कोणती घटना आहे का, जेव्हा तुला वाटले की आता काही खरं नाही अन् नंतर लगेच तुला आशेचा किरण दिसला?
नील : जॉनी गद्दार चित्रपटाच्या शूटिंगची गोष्ट आहे. चित्रपटाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर, दुर्दैवाने, झमूजी (वित्तपुरवठादार) यांनी आर्थिक कारणांमुळे आणि बजेटमुळे चित्रपट थांबवला. अनेकांनी जॉनी गद्दार चित्रपट सोडायला सांगितले. कारण अडकलेला चित्रपट कधीच प्रदर्शित होत नाही. त्या दिवशी मी घरी गेलो आणि रडू लागलो. मला वाटलं, लोक किती सहजपणे चित्रपट थांबवतात. मी त्यावेळी ठरवले, की माझे पदार्पण याच चित्रपटातून करेन अन्यथा मी ही इंडस्ट्री सोडेन. मला खात्री होती की एकदा हा चित्रपट प्रदर्शित झाला की, नील अभिनय करू शकतो की नाही याबद्दलचे सर्व आवाज बंद होतील. त्यानंतर मनमोहन शेट्टी आणि त्यांची मुलगी पूजा शेट्टी यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्यांनी चित्रपट पूर्ण केला. चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचे खूप कौतुक झाले. माझा स्वतःवरील आत्मविश्वासही वाढला.

प्रश्न : नकारांच्या दीर्घ काळात, सर्वकाही अंतिम झाल्यानंतर, तुझ्याकडून भूमिका काढून घेण्यात आल्याचे कधी घडले आहे का?
नील : अरे देवा, मी काय बोलू, माझ्या कुटुंबाला आणि देवाला माहित आहे की अशा किती घटना घडल्या आहेत, त्या घडतच राहतात. एक घटना अशी आहे जिथे मला सांगण्यात आले की मी या चित्रपटाचा भाग आहे. मी ते जाहीर केले. पण नंतर मलाच डच्चू मिळाला. मला मोठा चित्रपट मिळाला म्हणून मी घर विकत घेतले होते. माझ्यासोबत जे काही घडले त्याने मला पूर्णपणे हादरवून टाकले. ज्या चित्रपट निर्मात्याने हे केले ते माझ्यासाठी वडील आणि भावासारखे होते. एके दिवशी मला वर्तमानपत्रातून कळले की चित्रपट आधीच दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सुरू झाला आहे. माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. मी त्याला त्याच्या वचनाची आठवण करून दिली आणि माझे गृहकर्ज आणि ईएमआयचा उल्लेख केला, मग तो म्हणाला, तू इतकी मोठी स्वप्ने का पाहतोस? तुम्हाला आताच मोठे घर खरेदी करण्याची गरज का आहे? तोपर्यंत मी त्या चित्रपटासाठी अनेक मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचे चित्रपट नाकारले होते. यामुळे लोकांना वाटले की मी गर्विष्ठ आहे. खूप नुकसान झाले आणि माझा संघर्ष पुन्हा सुरू झाला.
प्रश्न : तुझ्या संपूर्ण प्रवासात कुटुंब कसे आधारस्तंभ ठरले आहे?
नील : माझे कुटुंब माझा आधार आहे. जर आज माझे मानसिक संतुलन ठीक असेल आणि आज मी या आशेने चेहऱ्यावर हास्य घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि संधी शोधत असेल, तर याचे श्रेय कुठेतरी माझ्या कुटुंबाला जाते. एक सर्जनशील व्यक्ती म्हणून माझ्या आत एक आग आहे, पण ती आग प्रज्वलित करणे खूप महत्वाचे आहे, अन्यथा ती दुसरे रूप धारण करू शकते आणि तिला प्रज्वलित करण्याचे हे काम माझे कुटुंब करते. माझे आई- वडील, भाऊ, पत्नी, माझी मुलगी, मला सतत पाठिंबा देतात. ते म्हणत राहतात, तुमचा वेळ येईल. सध्या मी एक दक्षिण भारतीय चित्रपट करत आहे. आणखी एक मोठा चित्रपट आहे, ज्यामध्ये अनेक मोठे कलाकार आहेत आणि मी फक्त एका चांगल्या संधीच्या शोधात आहे.