सुप्रसिद्ध अभिनेत्री निमरत कौरने नाटकांपासून सुरुवात केली आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमध्ये काम केले असले तरी, तिला इरफान खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत लंच बॉक्स चित्रपटातून खरी ओळख मिळाली. त्यानंतर निमरतने कधीही मागे वळून पाहिले नाही. एअर लिफ्ट आणि दसवीसारखे तिचे चित्रपट असोत किंवा होमलँड आणि स्कूल ऑफ लाईज सारख्या वेब सिरीज असोत, तिने सर्वत्र स्वतःला सिद्ध केले आहे. सध्या तिला तिच्या नवीन सिरिज ‘कुल’मधील इंद्राणी रॉय सिंगच्या भूमिकेत खूप पसंत केले जात आहे. निमरत ही शौर्य चक्र पुरस्कार विजेते शहीद मेजर भूपेंद्र सिंह यांची कन्या आहे.

एका विशेष मुलाखतीत निमरतला विचारण्यात आले, की जेव्हा तू ११ वर्षांची होती तेव्हा तुझे वडील मेजर भूपिंदर सिंह सैन्यात सेवा देत होते, ते काश्मीरमध्ये शहीद झाले. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मुलगी म्हणून तो काळ तुझ्या कसा होता? त्यावर निमरत म्हणाली, की मुलगी म्हणून बाबांना मिळालेले शहादत हे माझे भाग्य होते. त्यावेळी माझ्याकडे दोन पर्याय होते. एकतर मी आयुष्यभर माझ्या वडिलांना गमावल्याचा भार वाहावा किंवा मी असे काहीतरी करावे ज्यामुळे माझ्या वडिलांना अभिमान वाटला असता. मी दुसरा मार्ग निवडला. आम्ही नुकतेच त्यांच्या जन्मगावी गंगानगर येथे त्यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हे आमचे स्वप्न होते. बाबा आता नाहीत पण त्यांचे बलिदान आपल्या आठवणीत ठेवण्यासाठी हे आवश्यक होते. मी जे काही करते तेव्हा मला जाणवते की बाबांचे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. मला बऱ्याचदा ते इथे असावेत अशी इच्छा होते, पण त्याच वेळी त्यांनी देशसेवेसाठी आपले जीवन अर्पण केले याचा मला अभिमान वाटतो. एक भारतीय नागरिक म्हणून, मी नेहमीच हे सांगेन की मी सशस्त्र दलांची कन्या आहे आणि आपले सैन्य ही आपली ताकद आहे.

तू स्वतः एक खंबीर आणि स्वावलंबी मुलगी आहेस आणि पडद्यावर अनेक खंबीर महिला भूमिका साकारल्या आहेत, पण आजच्या महिलांसाठी तुला सर्वात आव्हानात्मक काय वाटते?, असे निमरतला विचारले असता ती म्हणाली, की महिलांच्या वागण्या- बोलण्याबद्दलच कायम मत व्यक्त केलं जातं. पुरुषांबद्दल असं होताना फारसं दिसत नाही. त्यामुळे आपल्याला आपले जीवन आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार जगावे लागेल. तुम्हाला तुमचे स्वतःचे नियम बनवावे लागतील. आपण समाज बदलू शकत नाही, परंतु आपल्या जीवनाचे नियंत्रण आपल्या हातात असले पाहिजे, असे निमरत म्हणाली.
सोशल मीडिया कसे हाताळते?
सोशल मीडियावरील नकारात्मकता, अफवा आणि ट्रोलिंग कसे हाताळते, याबद्दल बोलताना निमरत म्हणाली, की मी नेहमीच सकारात्मकता ठेवते. बऱ्याच वेळा मला असे वाटते की हे चुकीचे आहे. एक समाज म्हणून आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपण संभाषण कुठून सुरू करतो आणि कुठे संपवतो. मी अशा व्यवसायात आहे जिथे प्रत्येकाला माझ्याबद्दल मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु मला त्या मताचा विचार न करण्याचाही अधिकार आहेच, असे ती म्हणाली.
पुरुषप्रधान विचारसरणीवर म्हणाली…
अनेक बदल होऊनही, समाजात शतकानुशतके स्त्रीद्वेष, असमानता आणि महिलांबद्दल पुरुषप्रधान विचारसरणी कायम आहे. तू कधी या कटू अनुभवांमधून गेलीस का, या प्रश्नावर निमरत म्हणाली, की माझ्या वडिलांनी मला कधीच असे वाटू दिले नाही की मी मुलगी आहे. वयाच्या ११ व्या वर्षापर्यंत मला कधीच कळले नाही की मी मुलगी आहे. जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला वाटले, अरे मी एक मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मला ११ वर्षे जे संगोपन दिले, त्यातून खंबीर राहण्यास शिकवले गेले. माझा हा पाया इतका मजबूत आहे की मी आजपर्यंत त्यावर ठाम आहे. जर मला काही हवे असेल तर मी ते मिळविण्यासाठी काहीतरी करेनच. त्यामुळे जगातील कोणताही स्त्रीद्वेष किंवा पुरुषप्रधानता त्या तुलनेत फिकट पडते. मला हे देखील माहित आहे की प्रत्येक मुलीला असे संगोपन किंवा संधी मिळत नाहीत, म्हणून एक कलाकार आणि देशाचा नागरिक म्हणून, मला महिलांना प्रेरणा द्यायची आहे. जसे की, द टेस्ट केस वेब सिरीज पाहिल्यानंतर, अनेक मुली सैन्यात सामील झाल्या. मला वाटतं की जर माझ्यामुळे एका मुलीलाही प्रेरणा मिळाली तर ते व्यवस्थेला आव्हान देण्यासारखे आहे.