छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वार पोलीस पतीला तब्बल ५०० फूट फरपटत नेत चिरडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. हा भीषण अपघात छत्रपती संभाजीनगर-वाळूज मुख्य रस्त्यावरील कामगार चौकात आज, १२ मे रोजी सकाळी ९ च्या सुमारास घडला.
संजय जयसिंग घुणावत (वय ५०, रा. वाळूजवाडी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. ते खासगी कंपनीत सुरक्षारक्षक होते. त्यांची पत्नी पोलीस खात्यात कार्यरत आहेत. संजय घुणावत पंढरपूरहून कामगार चौकातून वळत घेत होते. त्याचवेळी भरधाव ट्रकने (एमएच २६ एडी ४९९५) त्यांच्या दुचाकीला (क्र. एमएच २० एचई ०६३०) उडवले. धडक दिल्यानंतर ट्रकने ५०० फूट फरफटत नेल्याने घुणावत यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी ट्रकची तोडफोड केली. ट्रकखाली अडकलेली दुचाकी बाहेर काढली. पोलिसांनी ट्रक पोलीस ठाण्यात जमा केला आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. संजय घुणावत यांचे चुलत भाऊ विजयसिंग राजपूत यांनी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास केला जात आहे.