छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घरासमोर उभे राहून गप्पा करण्याला विरोध केला म्हणून तिघांनी १८ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करून तीक्ष्ण वस्तूने वार केले. यात तरुण जखमी झाला. ही घटना समतानगरात रविवारी (११ मे) रात्री १० च्या सुमारास घडली.
रेहान अमजद कुरेशी (वय १८, रा. मोहम्मदिया मशिदीजवळ, जाकिर किराणा दुकानाच्या बाजूला, समतानगर छत्रपती संभाजीनगर) याने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तो सावरकर चौकात पालखी वॉशिंग सेंटरवर काम करतो. रविवारी रात्री १० च्या सुमारास तो समतानगर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर पटांगणात उभा असताना नूतन कॉलनी, मुनलाईट हॉटेलसमोर राहणारा मुलगा मुज्जू पठाण व त्याच्यासोबत उजेन बागवान, मुदस्सीर पठाण हे त्याच्या घरासमोर उभे राहून गप्पा मारत होते.
रेहानने त्यांना ‘तुम्ही आमच्या घरासमोर उभे राहून गप्पा मारू नका’ असे सांगितले. त्यावरून तिघांनी शिविगाळ करून मुज्जू पठाण याने मागून दोन्ही हात धरून ठेवले. मुदस्सिरने त्याच्या हातातील काहीतरी तिक्ष्ण वस्तूने रेहानच्या नाकावर मारून नाक फोडून जखमी केले. आमच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली तर तुझे हातपाय तोडून टाकू, अशी धमकी दिली. घाटी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आज रेहाने तिघांविरुद्ध क्रांती चौक पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बाळू जाधव करत आहेत.