छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : शिवाजीनगर गारखेडा भागातील उद्योग शिव अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील गाळ्यात ऑनलाइन जुगार खेळवला जात असल्याचे कळताच पोलिसांनी छापा मारून ८२ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दुकान चालवणाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शनिवारी (१० मे) रात्री आठच्या सुमारास शहर गुन्हे शाखेने केली.
शहर गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार परभत म्हस्के यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांच्या पथकात काम करतात. शनिवारी (१० मे) सायंकाळी विनायक शेळके यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे, पोलीस अंमलदार होनराव, गावंडे, तायडे, मुठे, काकड, नागरे, चालक पोलीस अंमलदार चौरे असे शासकीय वाहनातून शहरात गस्त घालण्यासाठी निघाले. पेट्रोलींग करत असताना रात्री आठला पोलीस उपनिरीक्षक बोडखे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर गारखेडा भागातील उद्योग शिव अपार्टमेंटमधील प्रदीप थोरवे याच्या मालकीच्या तळमजल्यातील गाळा क्रमांक २ मध्ये एक व्यक्ती कॉम्पुटरवर ऑनलाईन जुगार खेळवत आहे. त्यानंतर पोलिसांनी लगेचच उद्योग शिव अपार्टमेंट गाठले. अपार्टमेंटच्या तळमजल्यातील थोरवे याच्या मालकीच्या गाळ्यात लाल पडदा लावलेला दिसला.
कापडी पडदा बाजूला करून पाहिले असता आतमध्ये लाकडी कॉऊंटरवर मॉनिटर ठेवून एक व्यक्ती दिसला. राहुल मधुकर माने (वय २४, रा. गणेशनगर, भारतनगर, गारखेडा परिसर) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. त्याच्या समोरील कॉम्प्युटरमध्ये ऑनलाइन जुगार सुरू होता. राहुल माने याने सांगितले, की ऑनलाइन गेममध्ये लोकांकडून पैसे घेऊन त्यावर लोकाच्या सांगण्यावरून अंक लावून गेमवर त्यांनी सांगितलेला अंक लागल्यास एक रुपयाला ९० रुपये असे पैसे देतो. हा गेम हा देवा पाटील (रा. वाळूज) याच्या सांगण्यावरून या ठिकाणी चालवत असल्याचे व त्यासाठी रोज झालेल्या फायद्यावर ६ टक्के कमिशन मिळत असल्याचे सांगितले. ही जागा प्रदिप थोरवे रा. खडी रोड, बीड बायपास) याची असल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांनी २० हजारांचा कॉम्प्युटर, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ८२ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुल मानेसह देवा पाटील, प्रदीप थोरवे या तिघांविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय वानखेडे करत आहेत.