खुलताबाद (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना खुलताबाद तालुक्यातील इंदापूर- बोडखा रस्त्यावरील बाजारसावंगीजवळ शुक्रवारी (२५ एप्रिल) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
पंडित केरुबा भालेराव (वय ४०, इंदापूर, ता. खुलताबाद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी (२७ एप्रिल) सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. भगवान मते (रा. बिल्डा) हे कारने (क्र. एमएच २८ एझेड ६६९९) बाजारसावंगीकडे जात होते. दुचाकीवरून (क्र. एमएच २० जीडी ३६८८) इंदापूर येथील पंडित केरुबा भालेराव, रावसाहेब छगन निकम, सोपान विनायक निकम बाजारसावंगीकडून इंदापूरकडे जात होते.
बाजारसावंगीपासून अर्धा किमी अंतरावर कारने दुचाकीला जोरात धडक दिली. पोलिसांनी रावसाहेब आणि सोपान यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात तर पंडित यांना घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना पंडित यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर दुपारी इंदापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या प्रकरणी कार चालक मतेविरुद्ध खुलताबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.