छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय जनता पक्षाच्या शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने माप कुणाच्या पदरात पडते, हे पाहणे उत्सुकता वाढवणारे ठरणार आहे. प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माजी महापौर भगवान घडामोडे, किरण पाटील इच्छुक आहेत. विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनाच महापालिका निवडणुकीपर्यंत मुदतवाढ द्यावी, यासाठीही काही प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पक्ष नवा शहराध्यक्ष देणार की विद्यमान शहराध्यक्षांनाच मुदतवाढ देणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
दर तीन वर्षांनी भाजपमध्ये नवीन कार्यकारिणी निवडली जाते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने सदस्य नोंदणीवर भर दिला. महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने शहरातील ११ मंडळ अध्यक्षांसह कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ग्रामीणच्या तालुकाध्यक्षांचीही निवड झाली आहे. येत्या २ आठवड्यांत शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडले जातील, अशी शक्यता आहे. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने सध्या भाजपच सर्वांत मोठा पक्ष आहे. या पक्षाचा शहर-जिल्हाध्यक्ष होणे मोठे मानाचे आणि प्रभावशाली ठरणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ३० एप्रिल ते २ मेपर्यंत निवड प्रक्रिया पूर्ण होईल, असे भाजपचे संघटनमंत्री संजय कौडगे यांनी पत्रकारांना सांगितले.