छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : जालना रोडवरील हॉटेल कलिंगामध्ये शुक्रवारी (२५ एप्रिल) रात्री आठला मोठाच राडा झाला. तिघांच्या टोळक्याने दोन तरुणांना बेदम मारहाण केली. टोळक्यातील एकाने तरुणावर पिस्तूल रोखले. सिडको पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, पिस्तूल आणि सहा राऊंड जप्त केले आहेत.
कार्तिक लोकल (रा. गारखेडा परिसर), कमलेश मुदिराज, जीवन कुरेवार अशी संशयितांची नावे आहेत. आशिष वसंतराव पवार (वय ४२, रा. साईनगर) यांनी याप्रकरणात तक्रार दिली आहे. ते आणित्यांचे मित्र मनोज महाले जेवणासाठी रामगिरीमागील कलिंगा हॉटेलमध्ये गेले होते. जेवण करताना पवार यांना कॉल आल्याने ते बोलत बाहेर गेले. परत आल्यानंतर त्यांनी पाहिले की, बाजूच्या टेबलवर बसलेले तिघे मनोज महाले यांच्याशी वाद घालत होते. वाद वाढल्यावर तिघांनी मनोज महाले यांना शिवीगाळ करत हातातील कड्याने व हाताचापटाने मारहाण सुरू केली.
कार्तिकने कमरेचे पिस्तूल काढून महालेंवर रोखून धमकावले. पवार यांनी विचारणा केली. तेव्हा त्यांनाही मारहाण केली. हॉटेल मॅनेजरने तिघा संशयितांची नावे सांगितल्यानंतर सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले. श्री. देवकते म्हणाले, की धमकावण्यासाठी वापरलेले पिस्तूल नकली असून, ती एअरगन आहे. त्यात राऊंड आहेत. फायर केल्यानंतर मोठा आवाज होऊन जाळ निघतो. जवळून फायर केल्यास इजाही पोहोचू शकते.