छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्येच्या २ अशा घटना समोर आल्या आहेत, ज्या वाचल्यानंतर डोके चक्रावून जाते. बनेवाडीत अवघ्या १८ वर्षांच्या मुलाने धडधडत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले. दुसऱ्या घटनेत नातेवाइकाच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या २७ वर्षांच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही घटनांचे कारण शोधण्यात आता पोलीस व्यस्त झाले आहेत.
बनेवाडी परिसरातील रूळावर विकास सागर परदेशी (वय १८, रा. कुंभारवाडा, बनेवाडी) उडी घेतली. धडधडत्या रेल्वेने त्याच्या शरीराची चाळणी केली. ही घटना शनिवारी (२६ एप्रिल) मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. विकास मजुरीकाम करायचा. त्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई घरकाम करते. शनिवारी रात्री विकासने आईसोबत जेवण केले. मित्रांकडे जातो, असे म्हणून तो बनेवाडी परिसरातील रूळाकडे गेला. धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. ही बाब लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ त्याला घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. विकासला एक बहीण असून तिचा विवाह झाला आहे. विकासच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. वेदांतनगर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, अधिक तपास अंमलदार सुनीता मोरे करत आहेत.
पाहुणीची आत्महत्या
काही दिवसांपूर्वी नातेवाइकांकडे राहण्यासाठी आलेली २७ वर्षीय नीलेश्वरी निशाद या तरुणीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या सुमारास घडली. जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. नीलेश्वरीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यावर नातेवाइकांनी तत्काळ तिला बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी नीलेश्वरीला मृत घोषित केले. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अधिक तपास पोलीस अंमलदार जी. जी. जाधव करत आहेत.
नवगावमध्ये विवाहित तरुणाची आत्महत्या
पैठण तालुक्यातील नवगाव येथे रविवारी (२७ एप्रिल) नौशाद वजीर बेग (वय २७, रा. नवगाव) या विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवगाव परिसरातील शेतात पिंपळाच्या झाडाला नौशाद लटकलेला असल्याचे ग्रामस्थांनी पाहताच खाली उतरवून पैठण येथील शासकीय रुग्णालयात नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.