जालना (अरविंद देशमुख : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज, २० जुलैला पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले आहेत. त्यानंतर काहीच वेळात अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. जरांगे यांनी पत्र स्वीकारले. मात्र सरकार मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे ठामपणे सांगितले.
जरांगे यांच्या उपोषणामुळे सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. यावेळी जरांगे यांनी मराठा समाजाला मोठे आवाहन केले आहे. राज्यात कुठेही आंदोलन करून मराठा समाजाने शक्ती दाखवू नये, असे आवाहन त्यांनी केले. समाज माझ्या उपोषणाला विरोध करतो. मात्र तरीही मी त्यांच्यासाठी उपोषण करत असून, जगलो तर पुढच्या दौऱ्यावर जाणार. मेलो तर पुढचे दौरे रद्द होतील. रुग्णवाहिकेतून दौऱ्यात येणार. जिथे दौरे होणार तिथे ताकदीने तयारी करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले. मराठा समाजाला ओबीसीत सरसकट आरक्षण द्या. आरक्षणाच्या बाबतीत आम्ही ठाम असल्याचे ते म्हणाले. सगेसोयऱ्याबाबतची आमची मागणी कायम असल्याचेही ते म्हणाले.