छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखीने सोन्याच्या दोन लाखांच्या बांगड्या चोरून नेल्या आहेत. सीसीटीव्ही फूटेजमध्ये त्यांचा कारनामा कैद झाला आहे. ही बाब मंगळवारी (१८ मार्च) समोर आल्यानंतर व्यापाऱ्याने सिटी चौक पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या महिलांचा शोध सुरू केला आहे.
ओमप्रकाश शांतीलाल पुरवार (वय ४९, रा. पुरवार निवास सराफा रोड, मोहन टॉकीजच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. ते आणि त्यांचे भाऊ जयेश शांतीलाल पुरवार असे दोघे मिळून न्यू विश्वास ज्वेलर्स नावाचे सोने-चांदीचे दागिन्यांचे दुकान सराफा रोड येथे चालवतात. र विवारी (१६ मार्च) नेहमीप्रमाणे जयेश यांनी सकाळी ११ ला दुकान उघडले. त्यानंतर दुपारी साडेबाराला ओमप्रकाश दुकानावर आले. त्यानंतर दुपारी दोन महिला ग्राहक काळाबुरखा घातलेल्या आल्या. त्यांनी सोन्याच्या बांगड्या दाखवा, असे सांगितले. ओमप्रकाश यांनी त्यांना बांगड्या असलेल्या काऊंटरकडे नेले.
ओमप्रकाश पुरवार आणि दुकानात काम करणारे सेल्समन बबलू लखनलाल भुरेवाल यांनी बांगड्या असलेल्या डब्याचे वजन करून त्या दाखविण्यास सुरुवात केली. त्या महिला बांगड्या बघू लागल्या. त्यांना बांगड्या आवडल्या नाही म्हणून त्यांनी अजून दुसऱ्या बांगड्या दाखवा, असे म्हटल्याने आधीचा बांगड्या असलेला डब्बा तसाच बाजूला ठेवून दुसऱ्या पॅटर्नच्या सोन्याच्या बांगड्या असलेला डब्बाचे वजन करून त्यांना त्यातील बांगड्या दाखविल्या. पैकी त्यांनी २२ कॅरेटची बांगडी पसंद करून ती आम्हाला १८ कॅरेटमध्ये बनवून पाहिजे, असे सांगितले व तशी ऑर्डर केली. त्यासाठी रोख ५ हजार रुपये जमा केले. पावती बनवून देण्यासाठी त्यातील एका महिलेने तिचे नाव फातेमा बेग (रा. रेल्वे स्टेशन सिल्कमिल कॉलनी) असे सांगितले. तिने मोबाइल नंबरही दिला. त्यानंतर कामाच्या ओघात डब्यांचे परत वजन करून घेण्याचे ओमप्रकाश पुरवार विसरून गेले.
१८ मार्चला वेगळाच प्रकार आला समोर…
मंगळवारी (१८ मार्च) सोन्याच्या बांगड्यांच्या डब्याचे वजन व नग मोजले असता वजन व नग कमी आले. त्या अनोळखी महिलांनीच नजर चुकवून २२ कॅरेटसारख्या १८ कॅरेटमध्ये दोन सोन्याच्या बांगड्या बनवून द्या, असे म्हणून २ लाख रुपयांच्या २२ कॅरेटच्या दोन सोन्याच्या बांगड्या (वजन ४१ ग्रॅम १२० मिलीग्रॅम) लांबवल्याचे लक्षात आले. दुकानात लावलेले CCTV फूटेज बघितले असता दोन महिलांपैकी एक महिला या बांगड्या चोरताना दिसत आहे. महिलांनी दिलेला मोबाइल नंबरही बंद येत आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ओमप्रकाश पुरवार यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी दोन्ही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार सुधाकर मिसाळ करत आहेत.