छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट टाकून माजी उपमहापौर आणि त्यांच्या जावयाचा मानसिक छळ करण्यात आल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. व्हॉट्स ॲपवरही बदनामीकारक मेसेज करण्यात आले. अखेर वैतागलेल्या जावयाने वेदांतनगर पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशाल कस्तुरचंद बडजाते अंदाजे (वय ४५, रा. सतीश पेट्रोलपंपमागे, विवेकानंद कॉलेजजवळ, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. माजी उपमहापौरांच्या ३९ वर्षीय जावयाने या प्रकरणात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे, की ते पद्मपुऱ्यात कुटूंबासह राहतात. ते शेती व व्यापार व्यवसाय करतात. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी चारला घरी असताना त्यांच्या मोबाइलवर विशाल बडजाते यांनी व्हॉटस् ॲप मेसेज केला. तो उघडून पाहिला असता त्यात त्यांचा व त्यांच्या सासऱ्याचा फोटो, त्यांच्या फोटोवर भूमाफीया असे लिहिलेले होते. सासऱ्याच्या फोटोवर माजी उपमहापौर व दोघांच्या फोटोखाली छत्रपती संभाजीनगरचे खंडणी बहाद्दर असे नमूद होते.
विनाकरण वाद नको म्हणून त्यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर विशाल बडजाते यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली. त्यात माजी उपमहापौर व त्यांचे जावई यांची गुंडगिरी… आमच्या प्लॉटवर मागच्या रूममध्ये अवैधरित्या प्लॉट बळकावण्याच्या उद्देशाने गुंड प्रवृत्तीची माणसे बसविली. आमच्याकडून १५ लाखांची खंडणी घेतली. आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली. असल्या भूमाफीयांमुळे आपल्या संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करून त्यांना अटक करावी असा मजकूर लिहिलेला होता. पोस्टमध्ये माजी उपमहापौर आणि त्यांच्या जावयाचा फोटोही होता. ही पोस्ट पाहून जावयाला मित्रांचे कॉल आले. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०२५ रोजी विशाल बडजाते यांनी फेसबुकवर माजी उपमहापौरांच्या जावयाचा व्यावहारीक व्हिडीओ टाकला आणि खंडणी घेताना असे कॅप्शन लावले. हीच पोस्ट विशाल बडजाते यांनी २ मार्चला दुपारीही परत फेसबुकवर टाकली.
जावयाची पोलिसांत धाव…
विशाल बडजाते यांनी २४ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत आमचे बदनामीकारक फोटो व गुपचूप व्हिडीओ काढून त्यावर बदनामीकारक मजकूर लिहून व्हॉटस् ॲप व फेसबुकद्वारे सोशल मीडियावर प्रसारीत करून आमची समाजात व जनमानसात बदनामी केली, असे जावयाने वेदांतनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी बडजातेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविणा यादव करत आहेत.