छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : सुसाट ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली आणि पसार झाला. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १३ मार्चच्या मध्यरात्री १२ च्या सुमारास घडली. सिटी चौक पोलिसांनी आज, २० मार्चला त्याचा जबाब नोंदवून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
राहुल रमेश बचके (वय ३९, रा. गल्ली नं. ३ भीमनगर भावसिंगपुरा) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांच्यावर सध्या मेडीकव्हर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ते पत्नी आणि दोन मुलांसह राहतो. श्रीराम चिट्स प्रा. लि. या कंपनीत काम करतात. १३ मार्च २०२५ रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास टीव्ही सेंटर येथून भावसिंगपुऱ्याकडे दुचाकीने जात होते. जुब्लीपार्क सिग्नलवरून घाटीकडे वळत असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. त्यामुळे बचके हे गंभीर जखमी झाले. दुचाकीचेही नुकसान झाले. आजूबाजूचे लोक मदतीला धावून आले. त्यांचा मावसभाऊ सचिन संपत रगडे यांनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी मेडीकव्हर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. धडक दिल्यानंतर ट्रकचालक ट्रकसह पसार झाला. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार पंडीत वाघ करत आहेत.