मिर्झापूर सीझन ३ मध्ये बीना त्रिपाठीच्या भूमिकेत दिसणाऱ्या रसिका दुग्गलने अनेक चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. नुकत्याच दिलेल्या विशेष मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सांगितले. जमशेदपूर सोडून मुंबई कशी पोहोचली आणि नोकरी कशी मिळाली हे तिने विस्ताराने सांगितले. मनोरंजन विश्वात दीड दशकाहून अधिक काळ घालवलेल्या रसिका दुग्गलने हमीद, मंटो, किस्सा, क्षय यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद मिळाली. मेड इन हेवन आणि दिल्ली क्राइममधील तिच्या भूमिकांची विशेष कौतुक झाले. मात्र मिर्झापूर तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. आता या मालिकेच्या तिसऱ्या सीझनमध्ये ती पुन्हा एकदा बीनाच्या भूमिकेत आहे. तिच्याशी केलेली खास बातचीत…
आज ख्यातनाम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रसिकाला मात्र अभिनेत्री व्हायचं नव्हतं. ती म्हणते, की मी जमशेदपूरसारख्या छोट्या शहरातील आहे. माझ्या कुटुंबात एकही कलाकार नाही. मी जेव्हा दिल्लीच्या श्री राम महिला कॉलेजमध्ये शिकत होते, तेव्हा मी थोडा अभिनय केला होता. पण जेव्हा मी FTII (फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) मध्ये प्रवेश घेतला तेव्हा ६ महिन्यांतच मला कळून चुकले की मी हेच करायला पाहिजे. मनीष झा यांचा अन्वर हा माझा पहिला चित्रपट होता. मी १४ चित्रपटांमध्ये अशा भूमिका केल्या ज्यात माझे फक्त एक-दोन सीन होते, पण त्या भूमिकांच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचू शकले, असे ती म्हणाली.
बीनासारखी व्यक्तिरेखा साकारताना रसिका घाबरली नाही. तिचा मुद्दा स्पष्ट करताना ती म्हणते, माझ्या पात्रात चूक होईल याची मला भीती वाटत नव्हती. ही एक स्त्री आहे जी तिच्या लैंगिकतेबद्दल लाजाळू नाही. तिच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा तिच्या फायद्यासाठी कसा उपयोग करायचा हे तिला माहीत आहे. ती सर्व खेळ खेळते, त्यामुळे ते माझ्यासाठी खूप मनोरंजक होते. मला हे पात्र साकारताना खूप मजा येते. माझ्या आणि बीनाच्या देहबोलीत खूप फरक आहे. बीना ही अशी स्त्री आहे की ती आली की लोक नक्कीच तिच्याकडे वळून पाहतील. हा तिचा गुण आहे. तिच्याकडे काहीतरी आहे जे लोकांना आकर्षित करते, परंतु माझे व्यक्तिमत्व तसे नाही. माझ्याकडे फक्त लहान हावभाव आहेत. मी इकडून तिकडे उड्या मारत राहते, असे रसिका म्हणाली.
माझ्यासाठी स्ट्राँग असणेही धाडसीपणा…
आपल्या बोल्डनेसची व्याख्या करताना रसिका म्हणते, की साधारणपणे लोक लैंगिक संदर्भात बोल्ड हा शब्द वापरतात. माझ्यासाठी बोल्ड वुमन ही भूमिका मी मंटोमध्ये साकारली होती. सआदत हसन मंटोच्या पत्नीची साफियाची भूमिका माझ्यासाठी खूप बोल्ड आहे. ती स्त्री खूप मजबूत आहे. ती अशा व्यक्तीची काळजी घेत आहे ज्याला स्वतःबद्दल काहीच माहिती नाही. मंटोसोबत ती आयुष्याच्या अत्यंत खडतर टप्प्यातून जाते.
स्त्रियांच्या लैंगिकतेवर चर्चा व्हावी…
आज केवळ ओटीटीमध्येच नव्हे तर चित्रपटांमध्येही महिलांच्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलले जात आहे. एकेकाळी हे एक मोठे निषिद्ध मानले जात असे. हा बदल रसिकाला कसा दिसतो? या प्रश्नावर ती म्हणते, हे नैसर्गिक असावे. या विषयावर फार मोठी चर्चा व्हायला नको, पण आपण अशा समाजात राहतो, जिथे स्त्री तिच्या लैंगिकतेबद्दल बोलली तर ती निर्लज्ज असते. एकीकडे पुरोगामी आपण म्हणवून घेतो आणि दुसरीकडे अशा विषयावर चर्चा करायलाही कचरतो. त्यामुळे िस्त्रयांच्या लैंगिकतेवरही खुलेपणाने चर्चा व्हायला हवी, असे रसिका म्हणाली.
अभिनेता नवरा मिळाल्याने मी आनंदी
रसिका दुग्गलचा नवरा मुकुल चड्ढा देखील अभिनेता आहे. त्यांनी अनेक लघुपट आणि वेब सिरीजमध्ये काम केले आहे. अभिनेत्याचा नवरा असण्याचे फायदे सांगताना ती म्हणते, की मला वाटते की एक अभिनेत्री म्हणून अभिनेता पती असणे खूप छान आहे. आमचे प्रोफेशनच असे आहे, की आम्हाला वैयक्तिक नियोजन करता येत नाही. जेव्हाही एखादा प्लॅन बनवला जातो, मग ते बाहेर जाण्यासाठी असो किंवा इतर काही, त्याच दिवशी शूटिंग होते, मग तुमचा नवरा जर त्याच प्रोफेशनचा नसेल तर त्याला ते समजणार नाही. मुकुल स्वतः या क्षेत्रात असल्याने त्याला समजते. आम्ही अलीकडेच फेयरी फोक नावाचा एक चित्रपट एकत्र केला, ज्याची अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये प्रशंसा झाली. त्या चित्रपटात मुकुलसोबत काम करताना खूप मजा आली. शूटिंगला जाताना आम्ही सीन सोबतच खाण्यावरही चर्चा करायचो, असे ती म्हणाली.