जयपूर (सीएससीएन न्यूज डेस्क) : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सहावीत शिकणारी १२ वर्षांची निष्पाप मुलगी बलात्काराची बळी ठरली. एकदा तिच्यावर बलात्कार झाला, तेव्हा तिला धमकावले गेले आणि चार वर्षे तिचा लैंगिक छळ करण्यात आला. तिच्यावर मनात येईल तेव्हा बलात्कार केला जात असे. वारंवार होणाऱ्या अशा क्रूरतेमुळे ती निष्पाप मुलगी नैराश्यात गेली. मुलगी मानसिकदृष्ट्या कमकुवत झाली. तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले. आता मुलीने डॉक्टरांना तिच्यावरील अत्याचाराची कहाणी सांगितली आणि त्यानंतरच क्रूरतेची परीसीमा गाठणारी ही घटना उघडकीस आली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबाने करधनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मानसिकदृष्ट्या खचलेल्या मुलीचे वर्तन वेगळे भासू लागले होते. त्यामुळे तिला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेण्यात आले होते. मानसोपचार तज्ज्ञांनी मुलीवर बराच काळ औषधे देऊन उपचार केले. पण तिच्या तब्येतीत सुधारणा झाली नाही. तेव्हा डॉक्टरांना वाटले की मुलीसोबत काहीतरी अनुचित घटना घडली असेल, ज्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचलेली आणि भयग्रस्त आहे. त्यामुळे तिचे समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनादरम्यान, मुलीने ४ वर्षे घडलेल्या क्रूरतेचा पाढा वाचला.
शेजारी राहणारा तरुण बलात्कारी निघाला…
ही मुलगी तिच्या कुटुंबासह करदानी परिसरात राहते. दहा वर्षांपूर्वी, केकरी (अजमेर) जिल्ह्यातील प्राणहेडा येथील रहिवासी शक्ती सिंह राठोड त्यांच्या परिसरात भाड्याने राहायला आला. शेजारी असल्याने ती शक्ती सिंगला ओळखत होती. एके दिवशी शक्ती सिंग शाळेत पोहोचला आणि तिला घरी सोडतो, असे सांगून सोबत घेऊन गेला. घरी जाण्याऐवजी त्याने मुलीला एका पडक्या घरात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या काळात त्याने मुलीचे नग्न व्हिडिओ बनवले होते. हे व्हिडिओ आणि अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शक्ती सिंग मुलीवर सतत चार वर्षे बलात्कार करत होता.
तिच्या छातीवर ब्लेडने लिहिले आय लव्ह यू…
शक्ती सिंह इतका निर्दयी झाला की त्याने मुलीच्या छातीवर ब्लेडने चीरा मारल्या आणि आय लव्ह यू लिहिले. जे आजही तपासणीत दिसून आले. त्याच्याकडे मुलीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो होते. ते व्हिडीओ आणि फोटो आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना पाठवण्याची धमकी देऊन तो जेव्हा वाटायचे तेव्हा कॉल करून तिला बोलावून घ्यायचा. २०१६ ते २०२० पर्यंत सतत होणाऱ्या शोषणामुळे ही मुलगी नैराश्यात गेली. आता डॉक्टरांच्या मदतीने प्रकरण उघड झाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर, करधनी पोलिसांनी शक्ती सिंहला अटक केली.