नवी दिल्ली (सीएससीएन वृत्तसेवा) : भारतीय उद्योगपती गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह ग्रुपच्या अनेक उच्च अधिकाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी अमेरिकेने भारताची मदत मागितली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकन एजन्सी SEC ने भारताच्या कायदा मंत्रालयाकडून मदत मागितली आहे. हे प्रकरण २६५ दशलक्ष डॉलर्सच्या शेअर्समध्ये फेरफार आणि लाचखोरीशी संबंधित आहे. अमेरिकेच्या SEC कडून अदानी ग्रुपची चौकशी केली जात आहे. SEC ने न्यूयॉर्क न्यायालयाला सांगितले, की गौतम आणि सागर अदानी यांना न्यायालयीन नोटीस बजावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दोघेही भारतात राहतात.
गेल्या वर्षी, ब्रुकलिनमधील फेडरल प्रॉसिक्यूटर्सनी अदानी आणि अनेक ग्रुपच्या अधिकाऱ्यांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला होता. अदानी ग्रीन एनर्जीकडून वीज खरेदी करण्यासाठी ही लाच देण्यात आली होती. अदानी यांनी अमेरिकन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोपही करण्यात आला. अदानी ग्रुपने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. ग्रुपने म्हटले आहे, की ते सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करतील.
काय प्रकरण आहे?
SEC ने आरोपपत्रात म्हटले आहे की, गौतम अदानी, सागर अदानी आणि इतर सहा जणांनी २०२० ते २०२४ दरम्यान भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिली. ही लाच फायदेशीर सौरऊर्जेचे कंत्राट मिळविण्यासाठी देण्यात आली होती. या कंत्राटातून २० वर्षांत २ अब्ज डॉलर्सचा नफा होण्याची अपेक्षा होती.