छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याचा सूत्रधार, माजी आमदार सुभाष झांबडचे अनेक कारनामे समोर येत आहेत. मंगळवारी (१८ फेब्रुवारी) जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. शर्मा यांनी झांबडच्या पोलीस कोठडीत २० फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे. कधी अजिंठा बँकेची पायरीही न चढलेल्या तिघांच्या नावे एफडी दाखवून कर्ज उचलल्याचा प्रताप पोलीस चौकशीतून समोर आला आहे.
अजिंठा बँकेत ३६ एफडी अगेन्स्ट लोन प्रकार समोर आले आहेत. त्यातील तिघे कधीही अजिंठा बँकेच्या आसपासही फिरलेले नाहीत, की त्यांना अजिंठा बँकेची माहितीही नाही. मातीकाम करणाऱ्या रमेश जाधव यांच्या नावे १ कोटी २९ लाख रुपये, स्टेशनरीचे दुकानदार रमेश टकले यांच्या नावावर २ कोटी ३० लाख तर गृहिणी असलेल्या नौशिन सबा यांच्या नावावर ४ कोटी २६ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचे पोलीस चौकशीतून समोर आले. झांबडसह त्याच्या कुटुंबीयांची १२ खाती पोलिसांनी गोठवली आहेत. यात चारचाकी शोरूमच्या खात्याचाही समावेश आहे. या सर्व खात्यांमध्ये एकूण १२ कोटी रुपये आहेत. आर्थिक गुन्हे शाखा निरीक्षक संभाजी पवार यांनी ३६ एफडीओडी कर्ज प्रकरण, बनावट बँक बॅलन्स प्रमाणपत्र, गुन्ह्यातील इतर आरोपींचा सहभाग, ठेवीदारांच्या एकूण ठेवी व त्या संदर्भातील अभिलेख याबाबींवर चौकशी केली. झांबड यांनी काही मुद्यांवर बोलतोय तर काही मुद्यांवर चुप्पी साधत आहे.
क्रांती चौक पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झांबड १८ ऑक्टोबर २०२३ पासून फरारी होता. प्रशासकांना बँकेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर झांबड अटकेच्या भीतीने फरारी झाला होता. झांबडने अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय, नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नसल्याने त्याने ७ फेब्रुवारीला सकाळी आत्मसमर्पण केले होते.