छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जय शिवाजी- जय भारत’ या पदयात्रेचे आयोजन करण्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. यानिमित्त शहरात उद्या, १९ फेब्रुवारीला सकाळी साडेसात वाजता या पदयात्रेचा आरंभ होईल. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करून या पदयात्रेस सुरुवात होईल. त्यानंतर पैठण गेट, गुलमंडी मार्गे या पदयात्रेचा समारोप औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्याजवळ होईल.
कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण तथा दुग्धविकास व अपारंपारिक उर्जा मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदिपान भुमरे, विधान परिषद सदस्य आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण, विधानसभा सदस्य प्रदीप जयस्वाल, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्थित राहणार आहेत.
पदयात्रेत क्रीडा ज्योत विद्यार्थी नेतील. ही ज्योत यात्रेच्या समारोपानंतर विभागीय क्रीडा संकुलात नेण्यात येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी शिवकालीन वेशभूषेत व शिवचरित्रातील व्यक्तीरेखांच्या वेशभूषांमध्ये किंवा शालेय गणवेशात सहभागी होतील. क्रांती चौक येथे तलवारबाजी, सायकलींग, स्केटिंग, मल्लखांब, जिमनॅस्टिक, योगासन, पोवाडा, पाळणागीत आदी सादरीकरण होणार आहे. या पदयात्रेत नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्रसेना, तसेच शहरातील शाळा महाविद्यालये सहभागी होणार आहेत. सहभागाचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांनी केले आहे.