छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : मोबाइल हिसकावणारे लुटारू आता हिंसाचारावर उतरले आहेत. एकाचा मोबाइल हिसकावल्यानंतर त्याच्या मित्राने पाठलाग केला असता, लुटारूंनी त्याच्यावर चाकूचे वार केले आणि पसार झाले. ही घटना जालना रोडवरील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याजवळील पीव्हीआर टॉकीजसमोर सोमवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली.
सनावर शेख अनवर (वय २४, रा. आडूळ, ता. छत्रपती संभाजीनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सोमवारी (१७ फेब्रुवारी) ते आणि त्यांचे मित्र सुभाष खरात (रा. आडूळ) छत्रपती संभाजीनगर येथे नवीन पंखे घेण्यासाठी आले होते. नवीन पंख्यांचे सामान आडूळला पाठवून दोघे मुकुंदवाडी पोलीस ठाण्याजवळील PVR टॉकिजसमोर सायंकाळी साडेसातला त्यांची कार येण्याची वाट पाहत उभे होते. त्यावेळी सिडको बसस्थानकमार्गे पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवरून तीन अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी खरात त्यांच्या हातातील ते बोलत असलेला मोबाइल फोन हिसकावून पळू लागले.
अनवर यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून पकडले. त्यातील एकाने खरात यांचा मोबाइल खाली फेकला व गाडी चालवणाऱ्या अनोळखी व्यक्तीने स्कुटीवरून उतरून लोखंडी चाकू त्यांच्या डाव्या हाताच्या तळव्यावर मारला. त्यानंतर तिघेही स्कुटीवरून पळून गेले. खरात आणि अनवर हे सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी मेडिकल मेमो देऊन औषधोपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले. अनवर हे पोलीस ठाण्यात तक्रार देत असतानाच रमेश परमेश्वर पसनूर (५४, पद्मशालीनगर, सोलापूर) हेही पोलीस ठाण्यात आले. त्यांच्यासुद्धा हातातील मोबाइल स्कुटीधारक चोरांनी सिडको बसस्थाकावरून रात्री साडेअकराच्या सुमारास हिसकावून पळाल्याचे त्यांनी सांगितले.
असे सांगितले वर्णन…
तीन अनोळखी व्यक्ती, वय अंदाचे १८ ते २२ च्या दरम्यान, शरीराने धडधाकट, उंची अंदाजे साडेपाच फूट, त्यातील एकाच्या अंगात लाल शर्ट व दुसऱ्याच्या अंगात पांढरा शर्ट, तिसऱ्या अंगात पिवळसर शर्ट व जीन्स पॅन्ट, त्यांच्याजवळील पांढऱ्या स्कुटीचा क्रमांक अनवर यांना समजून आला नाही. पोलिसांनी तिघा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भारत पाचोळे करत आहेत.