छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : हायकोर्टसमोरील सिग्नलवर सोमवारी (१७ फेब्रुवारी) दुपारी डीजेच्या टेम्पोने (एमएच ०८ एच ५६४५) अचानक पेट घेतला. यामुळे धावपळ उडून जालना रोडवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. टेम्पो मुकुंदवाडीकडून सेव्हनहिल उड्डाणपुलाकडे जात होता. आगीत डीजेसह वाहनाचे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले.
चितेगाव येथील नितीन विनायक घोडके यांचा हा डीजे टेम्पो आहे. चिकलठाणा परिसरातील लग्नासाठी डीजी टेम्पो पाठविण्यात आला होता. सोमवारी दुपारी अडीचला परत चितेगावला आणताना हायकोर्टाच्या सिग्नलवर टेम्पोतून धूर येऊ लागला. टेम्पोत चालक स्वप्निल खरवडे होते. मालक दुचाकीवर पुढे होते. धूरानंतर लगेचच टेम्पोतून आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने बाजूच्या वाहनधारकांची धावपळ उडाली. टेम्पो थांबवून तातडीने अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. अग्निशमन विभागाचे ड्युटी इन्चार्ज मोहन नरके यांच्यासह जवान गोरखनाथ जाधव, दिनेश वेलदोडे, बाबासाहेब ताठे, आदिनाथ बकले व बाबासाहेब गव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
तोपर्यंत वाहतूक खोळंबली होती. टेम्पोला लोटून रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. टेम्पोमध्येच जनरेटर ठेवलेले होते. उन्हाच्या तीव्रतेमुळे तापून जनरेटर पेटल्याचा अंदाज आहे. आग टेम्पोच्या डिझेलच्या टाकीकडे गेली नाही, अन्यथा मोठीच दुर्घटना घडली असती. नितीन घोडके यांनी ३ वर्षांपूर्वी कर्ज काढून डीजे टेम्पो घेतला आहे. आगीत डीजेची मशीन, बारा स्पीकर, एक मशीन मिक्सर, अॅम्प्लिफायर पाच, पीच पट्टी, जनरेटर आणि दोन बॅटरी जळाल्या आहेत. टेम्पोचा इतर भागही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सर्व मिळून ३५ लाख रुपयांपेक्षा अधिकचे नुकसान झाले. डीजेचा विमा नसल्याने घोडके हे चिंताग्रस्त झाल्याचे दिसून आले.
सेंट्रल नाक्यावर पेटली कार
सेंट्रल नाका परिसरातील महापालिकेच्या प्रगती पेट्रोलपंपाच्या बाजूला वाहनतळावरील उभ्या इंडिका कारला (क्र. एमएच २० वाय ७४६३) रविवारी (१६ फेब्रुवारी) रात्री ११ च्या सुमारास आग लागून मागील भाग जळाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत पोहोचून आग विझवली. त्यामुळे पार्क केलेल्या बाकीच्या गाड्यांचे नुकसान टळले. कारच्या बाजूला विजेची डीपी होती, कचराही साठलेला होता. डीपीच्या ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागली असण्याचा अंदाज आहे. काही अंतरावरच प्रगती पेट्रोलपंप असल्याने अन्य कार पेटून आग तिथपर्यंत गेली असती तर मोठाच अनर्थ घडला असता.