लासूर स्टेशन (सीएससीएन वृत्तसेवा) : ३ लग्न केले, मात्र तिन्ही पत्नी सोबत राहत नसल्याने पतीपासून विभक्त राहणाऱ्या मोनिका मार्कस झांबरे उर्फ मोनिका सुमित निर्मळ (वय ३०, रा. रमाबाईनगर, रेल्वेस्टेशनजवळ, जालना) हिला प्रेमजाळ्यात अडकवले. कालांतराने तिनेही बोलणे कमी केल्याने आणि तिची वागणूक बदलल्याने शेख इरफान शेख पाशा (वय ३५, रा. लासूर स्टेशन, ता. गंगापूर) याने तिला लासूरस्टेशनला बोलावून घेत पडक्या घरात नेऊन हत्या केली… इरफान शेखने अखेर खुनाची कबुली दिली आहे.
लासूर स्टेशनजवळील दायगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या इरफानच्या शेतातील पडीक घरात पुरलेला मोनिकाचा मृतदेह पोलिसांनी १४ फेब्रुवारीला बाहेर काढला होता. मोनिका छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सादातनगरातील आयुष्मान रुग्णालयात आरोग्यसेविका होती. ती पतीपासून विभक्त राहत होती. जालन्यात आईसोबत ती राहायची आणि रेल्वेने जालना येथून छत्रपती संभाजीनगरला ये-जा करत होती. छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकापासून सादातनगरातील आयुष्मान रुग्णालयात येण्या-जाण्यासाठी मोनिका स्कुटी वापरायची. ही स्कुटी ती रेल्वेस्थानकावरील वाहनतळावर उभी करत असे.

रोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान यांच्यात ओळख झाली. पतीपासून समेट घडवून आणतो, असे बोलून त्याने मैत्री वाढवली. यातून दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र नंतरच्या काळात मोनिका इरफानला टाळू लागली. तिचा फोन नेहमी बिझी यायचा. यामुळे इरफान चिडला होता. त्याने तिला संपवायचे ठरविले. मोनिकाला लासूर स्टेशन येथे भेटायला बोलावले. त्याआधीच शेतातील पडीक घरात एक सहा फूट खोल खड्डा खोदून ठेवला होता. मोनिका ६ फेब्रुवारीला त्याच्यासोबत तिथे गेल्यानंतर प्रथम तुला गंमत दाखवितो म्हणून त्याने तिचे हात पाय बांधले. नंतर तिचा गळा आवळून खून केला, अशी माहिती शिल्लेगावचे पोलीस निरीक्षक चाऊस यांनी दिली.
लासूर स्टेशनच्या सराफाला विकले दागिने…
खून केल्यानंतर दोन दिवसांनी इरफानने मोनिकाच्या मोबाइलवरून तिच्या नातवाईकांना मी सुखरूप असून दुसरे लग्न केले आहे. आता मी तुम्हाला वर्षभराने भेटेल, असा मेसेज केला. मात्र कुटुंबीयांनी तिला कॉल केले, तेव्हा तो फोन उचलला जात नव्हता. इरफानने तिचे दागिने लासूर स्टेशन येथील एका सराफाला ४८ हजार रुपयांत विकले. तिची बॅग छत्रपती संभाजीनगरमधील एका नाल्यात फेकून दिली.
आईची पोलिसांत धाव…
६ फेब्रुवारीला ड्युटीसाठी घरातून निघाल्यानंतर मोनिका गायब झाली होती. तिचा मोबाइलही लागत नव्हता. त्यामुळे तिच्या आईने कदीम जालना पोलिसांत धाव घेतली आणि मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. जालना पोलिसांनी शेख इरफानला ताब्यात घेऊन चौकशी केली होती, पण त्याने उडवाउडवीची उत्तरे देत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याला सोडून देत त्याच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे सुरू केले होते. त्याच्या मोबाइलच्या कॉल डिटेल्ससोबतच लासूर स्टेशन येथील काही सीसीटीव्ही फूटेजही तपासले. मोनिकाचे त्याच्यासोबत कॉलवर तासन्तास झालेले संभाषण आणि ६ फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फूटेजमध्ये मोनिका व इरफान एकत्र दिसल्याचे समोर येताच १३ फेब्रुवारीला त्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने दोघांतील संबंधाची कबुली देत मोनिकाने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र कसून चौकशीत अखेर त्याने खुनाची कबुली दिली.