छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : फेसबुकर अनोळखी विदेशी महिलेची फ्रेंडरिक्वेस्ट स्वीकारणे, तिच्यासोबत चॅटिंग करणे छत्रपती संभाजीनगर शहरातील एका सरकारी नोकरदाराला १६ लाख ६९ हजार ७२७ रुपयांत पडले. महिलेने मौल्यवान वस्तू व विदेशी चलन पाठवत असल्याचे सांगितले. त्यानंतर भामट्यांनी कस्टममधील अधिकारी बोलत असल्याचे भीती दाखवत लूट केली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मिलिंद आश्रू म्हस्के (वय ५४, रा. शिवाजीनगर, गारखेडा परिसर) यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंद म्हस्के यांना कॅलरा अमोंग नावाच्या महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. म्हस्के यांनी ती स्वीकारताच तिने बोलायला सुरुवात केली. चॅटिंगमधून मैत्री घट्ट झाली. त्यानंतर दोघांनी व्हॉट्सअॅप क्रमांक शेअर केले. व्हॉट्स ॲपवर बोलणे सुरू असताना महिलेने ऑनलाइन गिफ्ट पाठवते, असे म्हणून पूर्ण पत्ता व माहिती मागितली. म्हस्के यांनी देताच काही दिवसांनी कॉल आला. आम्ही कस्टममधील अधिकारी बोलत असून, तुमचे पार्सल कस्टममध्ये अडकले आहे. तुम्हाला कस्टम ड्युटी भरून ते सोडवावे लागतील, अन्यथा तुमचे पार्सल रद्द होऊ शकते.
तुमच्यावर ईडी आणि आयकरची कारवाई होऊ शकते, असे सांगितले. विश्वास बसण्यासाठी व्हॉट्स ॲपवर त्यांनी आयकार्डही पाठविले. ई-मेलही केला. घाबरलेल्या म्हस्के यांनी कस्टम ड्यूटी आणि पार्सल चार्जेसच्या नावाखाली एका बँक खात्यातून ३ लाख ८६ हजार १५१ रुपये पाठविले. त्यानंतर दुसऱ्या बँक खात्यातून १२ लाख ८३ हजार ५७६ रुपये पाठविले. एकूण १६ लाख ६९ हजार ७२७ रुपये पाठवूनही पार्सल आणि मौल्यवान वस्तू काही आल्या नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. फसवणुकीची घटना १७ सप्टेंबर २०१९ ते २७ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत घडली आहे. फसवणूक झाल्याचे म्हस्के यांच्या १७ जानेवारी २०२० रोजी लक्षात आले. त्यानंतर पाच वर्षांनी आता १६ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.