छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धुळे-सोलापूर हायवेवर सुसाट वाहनाने ६९ वर्षीय महिलेला धडक देऊन पळ काढला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना यांना सोलापूर- धुळे हायवेवरील शेखापूर शिवारात तनवाणी शाळेसमोर शनिवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी साडेसहाला घडली.
अफसराबी शेख रहीम या (वय ६९, रा. सिल्कमिल कॉलनी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. अफसराबी शेख यांचा मुलगा शेख अजिम शेख गफूर (वय ३७,रा. रेल्वेस्टेशनजवळ सिल्कमिल कॉलनी) यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दिली आहे. ते इर्टिका कार चालवून उदरनिर्वाह करतात. शनिवारी सकाळी साडेसहाला त्यांचा मित्र शेख शाहरुख यांनी कॉल करून अपघाताची माहिती दिली. धडक दिल्यानंतर चालक वाहनासह पसार झाला. नागरिकांनी खासगी रुग्णवाहिका बोलावून अफसराबी यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून अफसराबी यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड करत आहेत.