छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दिल्लीगेट समोरील आफताब प्लाझातील दुसऱ्या मजल्यावरील बार्बेरीयन जीमला शनिवारी (१५ फेब्रुवारी) पहाटे तीनला भीषण आग लागली. संपूर्ण साहित्य आगीत खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तासभरात आगीवर नियंत्रण मिळवले. तिसऱ्या मजल्यावर एक मुलगा अडकून पडला होता. त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. ही घटना घडली.
शेख अल्ताफ अहमद यांची ही जीम असून, अत्याधुनिक स्वरुपाचे साहित्य होते. नेहमीप्रमाणे रात्री दहाला जीम बंद करण्यात आली. पहाटे तीनला अचानक आग लागून आगीचे लोळ उठले. मुख्य रस्त्यावरच बिल्डिंग असल्याने नागरिकांनी अग्निशमन दलाला कळवले. तोपर्यंत बिल्डिंगमधील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. तिसऱ्या मजल्यावर १६ वर्षीय मुलगा अडकला होता. त्याला जवानांनी सुखरुप बाहेर काढले. आग आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संपत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन केंद्र अधिकारी अशोक खांडेकर, ड्युटी अधिकारी हरिभाऊ घुगे, हरिश्चंद्र पवार, संजय कुलकर्णी, मुश्ताक तडवी यांच्यासह अग्निशमन जवान संदीप चव्हाण, सूरज राठोड, गोरख जाधव, दिनेश मुंगसे, प्रसाद शिंदे, संग्राम मोरे, दीपक गाडेकर, प्रणाल सूर्यवंशी, उमेश भोसले, त्र्यंबक सावंत, विक्रांत बकले, वाहन चालक नंदू घुगे, प्रशांत गायकवाड यांनी परिश्रम घेतले. आग कशामुळे लागली, किती नुकसान झाले हे पंचनामा झाल्यावरच समोर येणार आहे.