छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील करोडी येथे गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या ४ गोदामांवर छापे मारून पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी शालेय पोषण आहाराचा काळाबाजार समोर आणला होता. गुन्हा दाखल होताच कंपनी मालक संजय भागीरथमल अग्रवाल फरारी झाला होता. दौलताबाद पोलिसांनी त्याला कर्नाटक राज्यातील कलबुर्गी शहरातून पकडून आणले. तिथल्या एका रिसॉर्टमध्ये तो लपून बसला होता. शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी पोलिसांनी त्याची मानगूट पकडली. शनिवारी (१५ फेब्रुवारी) पहाटे अटक करून विशेष न्यायालयात हजर केले असता १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
१ फेब्रुवारीला केलेल्या कारवाईत ४ लाख किलो गहू आणि तांदूळ पकडण्यात आला होता. महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांचा ४ लाख किलो तांदूळ, एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आहाराच्या ३०० बॅग असा ४ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल होता. पोलिसांनी व्यवस्थापक मतिनोद्दीन गानफरोद्दीन काझी व सुपरवायझर बलवंतसिंग चौहान व रोहित सिंग यांना अटक केली होती. मात्र अग्रवाल सापडत नव्हता. पोलिसांनी मोबाइल लोकेशनवरून त्याचा शोध घेत कलबुर्गी गाठले. दरम्यान, सरकारचा नॉट फॉर सेल असलेला शालेय पोषण आहार अग्रवालने कुठून व कसा आणला, कोठे विक्री करणार होते, कोणत्या गाडीत हा माल आणला होता, गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, या मुद्द्यांच्या तपास अग्रवालकडून केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी पत्रकारांना सांगितले.
गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशन ही धान्य, कडधान्याची मिल मंगेश जाधव यांची असून, ७ वर्षांपूर्वी मुंबईस्थित संजय अग्रवाल याला ती १० वर्षांच्या करारावर देण्यात आली आहे. या ठिकाणी शासकीय धान्याचा काळा बाजार होत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांना मिळाली होती. त्याआधारे त्यांनी ६ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उपनिरीक्षकांसह छापा मारला होता. महाराष्ट्र, पंजाब शासनाचे धान्य यंत्रात टाकून रिपॉलिशिंग सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.