छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : भरधाव वेगात ट्रकने दुचाकीस्वार दोन तरुणांना उडवले. दोघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) रात्री दहाच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाण्याजवळ बजरंगनगर चौकात घडली. प्रदीप दादाराव गाडेकर (वय २४, रा. गाडेकर वस्ती, चित्तेपिंपळगाव) आणि विकास विठ्ठल मोरे (वय २५, रा. पांढरी पिंपळगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, प्रदीप आणि विकास हे शेंद्रा एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जात होते. मित्राच्या लग्नावरून परतल्यानंतर रात्रीच्या शिफ्टसाठी कंपनीत जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोरात धडक दिली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागेवरच सोडून पसार झाला. घटनास्थळीच प्रदीप आणि विकास यांचा मृत्यू झाला. प्रदीपवर चित्तेपिंपळगाव स्मशानभूमीत तर विकासवर पांढरी पिंपळगाव येथे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी सिडको एमआयडीसी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.