छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : बायजीपुऱ्यातील संजयनगरात ड्रग्ज एजंटला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर तिखटाच्या पाण्याचा मारा करत चपल-बूट फेकून मारण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (१५ फेब्रुवारी) सायंकाळी सातला घडली. ड्रग्ज एजंट शेख अब्रार शेख निसर (वय २४, रा. गल्ली क्रमांक १०, संजयनगर) याला पळवून लावण्यात आले.
अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्त्वातील पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्या पथकाने शेख मोहम्मद कैफ शेख मोहम्मद इसर (वय २२) याला नशेच्या गोळ्यांसह अटक केली होती. त्याच्या चौकशीतू शेख अबरार शेख निसर याचे नाव समोर आले होते. शेख अबरार विविध अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे त्याने सांगितल्याने पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी सहकाऱ्यांसह अबरारच्या घरी धडक दिली. त्यांनी घरात प्रवेश करताच अचानक तिखटाच्या पाण्याचा मारा झाला. सर्वात पुढे असलेले पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार मारोती गोरे, आनंद वाहूळ, संजीवनी शिंदे यांच्या डोळ्यांसह संपूर्ण शरीरावर तिखट पडले.
काही क्षण पोलिसांना तिथेच थांबावे लागले. त्यानंतर पोलिसांवर चपला, बूट, वजनकाटा फेकून मारण्यात आला. मात्र पोलिसांनी माघार न घेता घरात प्रवेश करत नशेच्या २१० गोळ्यांचा साठा, हुक्का, नायलॉन मांजाची रील जप्त केली. अबरारला कुटुंबीयांनी गच्चीवरून पळवून लावले. त्यामुळे तो हाती लागू शकला नाही. मोहम्मद कैफ, अबरारसह पोलिसांवर हल्ला करणाऱ्या मिजबा शेख हसन (वय १९), आसमा शेख हारुन (वय ३५), अबरारची पत्नी नाजिया (वय २३), प्रवीना शेख मुन्ना (वय ३८), सायमा शेख हारुन (वय २२) यांच्यासह १७ वर्षीय मुलीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबरारचे संपूर्ण कुटुंबच ड्रग्ज तस्करीत सामील आहे. यातून त्यांनी परिसरातही दहशत निर्माण केली आहे.