वाळूज महानगर (संजय निकम ) : दारू पिऊन आलेल्या लेकाने बापाला आधी शिवीगाळ केली आणि नंतर दोघांत हाणामारी सुरू झाली. बापाने मुसळीने लेकाच्या डोक्यात जोरदार प्रहार केले. यात लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना आज, १५ फेब्रुवारीला सकाळी वाळूज एमआयडीसीतील वडगाव कोल्हाटीत समोर आली. पोलिसांनी संशयित बापाला अटक केली आहे.

नारायण विनायक तुपे (वय ३२, रा. वडगाव कोल्हाटी) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. विनायक तुपे असे हत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. नारायणची आई सौ. हौसाबाई विनायक तुपे (वय ५०, मूळ रा. नरला ता. फुलंब्री. ह. मु. श्रीरामनगर वडगाव कोल्हाटी) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यांचे पती मजुरी काम करतात. त्यांना नारायण आणि सुरेश अशी दोन मुले असून, दोघेही कंपनीत काम करतात. तीन मुलीही आहेत. तिघींचेही लग्न झालेले आहे. दोन मुलांपैकी मोठा मुलगा नारायण दारू पिण्याच्या सवईचा असून तो रोज दारू पिऊन घरी आई व वडिलांशी भांडण करत असायचा. शुक्रवारी कामाला सुट्टी असल्याने नारायण घरीच होता. सकाळी १० लाच तो दारू पिऊन घरी आला. तेव्हा आई त्याला म्हणाली, की सकाळी सकाळी दारू का पिला? त्यावर तो म्हणाला की, मला आज सुट्टी आहे. मी दिवसभर दारू पिणार. त्यानंतर दुपारी १२ ला त्याने जेवण केले. काही वेळ आराम केल्यानंतर तो निघून गेला.

रात्री आठला विनायक तुपे, लहान मुलगा सुरेश तुपे असे घरी असताना नारायण दारू पिऊन घरी आला. त्याला चालता येत नव्हते. मात्र तो मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. अंगावर मारण्यासाठी धावून येत होता. त्यावेळी आईने त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. लहान मुलगा सुरेशला कानाला कमी ऐकू येते. त्यामुळे त्याला भांडण कशामुळे चालले हे काही समजत नव्हते. रात्री ९ च्या सुमारास नारायण आणि त्याचे वडील विनायक यांच्यात शिवीगाळीवरून हाणामारी सुरू झाली. आईने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला.
नारायण ऐकत नव्हता. तो वडील विनायक यांना मारहाण करतच होता. त्याच्यापासून वाचण्यासाठी वडील विनायक यांनी घरातील लोखंडी मुसळीने त्याच्या डोक्यावर मारले. दोन-चार घाव घातल्याने नारायण बेशुध्द पडला. नारायण दारू पिलेला असल्यामुळे व त्याला जास्त नशा आल्यामुळे तो शांत झाल्याचे त्याच्या आईला वाटले. डोक्यातून रक्त निघत असल्याने हौसाबाई यांनी पतीला आपण नारायणला दवाखान्यात घेऊन जाऊ, असे सांगितले. मात्र नारायणची रोजची किरकिर आहे. त्यामुळे त्याला दवाखान्यात घेऊन जायचे नाही. तू काही एक बोलायचे नाही, असे म्हणून पत्नीला शांत केले.
नारायण सकाळी उठलाच नाही…
आज, १५ फेब्रुवारीला पहाटे पाचच्या सुमारास हौसाबाई यांनी भाऊ गोरखनाथ ओळेकर यांना कॉल करून बोलावून घेतले. त्यांनी मोठ्या जावयाला बोलावून घेत नारायणला खासगी रुग्णवाहिकेने घाटी रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी नारायणला मृत घोषित केले. हौसाबाई यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनायक तुपेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास केला जात आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे पाटील, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.