कन्नड (सीएससीएन वृत्तसेवा) : अंबा (ता. कन्नड) येथून २००४ साली शेख जानी शेख रज्जाक (वय ४८) बेपत्ता झाले होते. तब्बल २२ वर्षांनी ते घरी परतले. सोशल मीडियाने ही कमाल घडवली. शेख जानी हे चंदिगडला कसे गेले हे त्यांनाही आठवत नाही. पण तिथल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारामुळे आज त्यांच्या कुटुंबीयांत ते परतले. त्यांच्या कुटुंबाला ते परत आल्याचा प्रचंड आनंद झाला. त्यांनी गावात त्यांची मिरवणूक तर काढलीच, पण गावजेवण करून गावालाही आपल्या आनंदात सामील करून घेतले. शेख जानी यांची पत्नी, मुलगा आणि मुलीला आनंदाश्रू अनावर झाले होते. चंदिगढला एका हिंदू आश्रमाने त्यांचा सांभाळ केला.
झाले असे, की…
शेख जानी यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्यांना २००४ मध्ये चाळीसगावच्या एका दवाखान्यात कुटुंबीयांनी नेले होते. तिथून ते गायब झाले. ते बेपत्ता झाल्याने नातेवाइकांनी धुळे, जळगाव जिल्ह्यात शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. ते थेट पोहोचले होते चंदीगडला. चंदीगडच्या रस्त्यांवर फिरत असताना २०१४ मध्ये त्यांचा अपघात झाला. पोलिसांनी त्यांच्यावर उपचार करवले. त्यांच्याकडे ते कोण, कुठून आले याबाबत विचारणाही केली. मात्र भाषा समजत नसल्याने त्यांनी शेख जानी यांना सोडून दिले. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी शेख जानी यांना चंदीगडच्या पिंगलवाडा येथील हरीश गुलाटी यांच्या आश्रमात दाखल केले. तेव्हापासून ते आश्रमातच राहत होते. आश्रमचालक गुलाटी यांनी शेख जानी यांच्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सुभाष शर्मा यांनाही सांगितले होते. तेव्हापासून शर्मा हे शेख जानी यांचे कुटुंबीय शोधण्यात व्यस्त होते. त्यांनी शेख जानी यांच्याशी चर्चा केली तेव्हा वैजापूर, चाळीसगाव, कन्नड अशी गावांची नावे शेख जानी यांनी घेतली.
शर्मा यांनी सुरू केले प्रयत्न…
आश्रमातील सहवासात शेख जानी यांची अवस्था बऱ्यापैकी ठीक झाली. त्यानंतर शर्मा यांनी सोशल मीडियावर शेख जानी यांचे फोटो व्हायरल करून कुटुंबीयांबाबत माहिती असल्यास कळविण्याचे आवाहन केले. हे फोटो व्हायरल होत होत थेट कन्नडच्या व्हॉट्स ॲप ग्रुपपर्यंत धडकले. शेख जानी यांच्या नातेवाइकांनी फोटो पाहून लगेच ओळखले. त्यानंतर सुभाष शर्मा यांच्याशी संपर्क करण्यात आला. त्यांनाही प्रचंड आनंद झाला. शेख जानी यांचे चुलतभाऊ शेख मुसा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष आहेत.
…अन् शेख जानी २१ वर्षांनी गावी आले!
कुटुंबीयांनी तातडीने चंदिगड गाठून शेख जानी यांची ओळख पटवली. त्यानंतर आश्रमातून त्यांच्याकडे शेख जानी यांना सुपूर्द करण्यात आले. शेख जानी यांना गावी आणताच कालीमठ फाटा ते अंबा गाव दुचाकी रॅली काढून, नंतर मिरवणूक काढत त्यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. गावात त्यांचा सत्कारही केला. कुटुंबीयांनी गाव जेवण देत अवघ्या गावात आपल्या आनंदात सामील करून घेतले. २१ वर्षांनी शेख जानी घरी येऊ शकले ते सोशल मीडियामुळे.