छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : धारदार शस्त्राचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कृषी खात्यातील कर्मचाऱ्याच्या वृद्ध आई-वडिलांना दमदाटी, मारहाण करत सव्वा लाखाचे दागिने लुटून नेले. ही खळबळजनक घटना चिकलठाणा परिसरातील सुंदरवाडीतील ध्रुव गोकुळधाम हौसिंग सोसायटीत गुरुवारी (१३ फेब्रुवारी) पहाटे तीनच्या सुमारास घडली.
अशोक रामप्रसाद कदम (वय ४७, रा. ध्रुव गोकुळधाम हौसिंग सोसायटी सुंदरवाडी ता. छत्रपती संभाजीनगर, (ह. मु. समृद्धीपार्क शहानूरवाडी बीडबायपास) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. सुंदवाडीत त्यांचे आई-वडील राहतात. मुलांच्या शिक्षणासाठी ते समृद्धीपार्क शहानूरवाडी बीडबायपास येथे राहतात. ते कृषी खात्यात नोकरीला आहेत. बुधवारी (१२ फेब्रुवारी) रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे साडेनऊला समृद्धी पार्कमधील घरी झोपी गेले होते. गुरुवारी पहाटे साडेतीनला त्यांना वडील रामप्रसाद साळीकराम कदम यांनी कॉल केला व सांगितले, की आपल्या सुंदरवाडीतील घरात चोरी झाली आहे. त्यानंतर अशोक कदम हे तातडीने सुंदरवाडीला आले. त्यांच्या वडिलांनी सांगितले, की पहाटे पावणेतीनला (मध्यरात्री) तीन चोर दरवाजा तोडून घरात शिरले.
चोर चोर म्हणून वडील मोठ्याने ओरडल्याने त्यातील एकाने त्यांना चापट मारून गप्प बसायला सांगितले. या गोंधळामुळे आई जागी झाली. चोरांनी दोघांना दमदाटी करून कपाटाची चावी घेतली व लोखंडी कपाट उघडून प्लास्टिकच्या कॅरिबॅगमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चाकूसारख्या शस्त्राने धाक दाखवून दमबाजी केली. चोरट्यांनी तोंड झाकलेले होते. तिघांपैकी एकाने खाकी जर्किन व दोघे काळे जर्किन घातलेले होते. एकाच्या पाठीवर निळी होती. याच दरम्यान झाल्टा येथील मुकुंद शिंदे यांच्या घरी देखील चोरी झाल्याची माहिती मिळाली. याच चोरट्यांनीच त्यांचेही घर फोडल्याचा संशय आहे. चोरट्यांनी कदम यांच्या घरातून ८५ हजार रुपयांची अडीच तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ, १६ हजार रुपयांची एक पाच ग्रॅम वजनाची सोन्याचे वेल, १४ हजार रुपयांचे सोन्याची कानातील फुले, १२ हजार रुपयांची ३ ग्रॅम सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख २७ हजार रुपये चोरून नेले. अधिक तपास पोलीस निरीक्षक समाधान पवार करत आहेत.