छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : आपल्या घरात सुरू असलेले भांडण पाहण्यासाठी दारात आलेल्या महिलेला संतापून युवकाने कानशिलात लगावली. त्यामुळे महिलेने त्याच्याविरुद्ध मारहाण, अश्लील शिवीगाळ, विनयभंग असे आरोप लावले. या प्रकरणात सागर रमेश शिंदे (वय २५, रा. बीड बायपास) याला १ महिना सक्तमजुरीची शिक्षा आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोहरा यांनी ठोठावली.
सागरला ठोठाविलेल्या दंडाच्या रकमेपैकी ८ हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून महिलेला मिळणार आहेत. ५३ वर्षांच्या महिलेने या प्रकरणात तक्रार दिली आहे. २९ मे २०२० रोजी सायंकाळी साडेपाचची मारहाणीची घटना घडली होती. महिला घरात असताना शेजारी राहणाऱ्या सागरच्या घरात भांडण सुरू होते. त्यामुळे महिला महिला दरवाजात येऊन उभी राहिली. आपल्या घरातील भांडण पाहण्यासाठी उत्सुकता दाखविल्याबद्दल सागरचा राग अनावर झाला.
तो गाडी घेऊन महिलेच्या घरासमोर आला. त्याने महिलेला शिवीगाळ केली. तेवढ्यावरच न थांबता तिच्या कानशिलात लगावली. पोलीस उपनिरीक्षक एस. के. चव्हाण यांनी या प्रकरणाचा तपास कनून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनवाणीवेळी सहायक सरकारी वकील व्ही. एम. शेळके यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने सागरला दोषी ठरवून एक महिना सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून अंमलदार अनिल खलाने यांनी काम पाहिले.