वाळूज महानगर (सीएससीएन वृत्तसेवा) : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला मुलीच्या काकूने जाब विचारला. त्याचा राग येऊन त्याने त्यांना शिवीगाळ करत धमक्या दिल्या व जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. दोघींच्या मदतीला धावलेल्या दोन नागरिकांना टवाळखोर आणि त्याच्या दोन साथीदारांनी मारहाण केली. त्यामुळे लोक जमले. त्याचे दोन साथीदारही कायम आणखी एका मुलीची छेड काढत असल्याचे समोर आल्यावर जमलेले लोक संतप्त झाले. त्यांनी तिघांनाही चोप दिला. टवाळखोरापैकी एकाचे तिथेच रेडिमेड कपड्यांचे दुकान आहे. त्या दुकानात तिघांनाही कोंडले व पोलिसांना कळवले. जमाव आक्रमक झाला होता, कोणत्याही क्षणीही काहीही घडू शकते. मात्र पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून सौम्य लाठीमार करत लोकांना पांगवले. दुकानातून तिघा टवाळखोरांना बाहेर काढून पोलीस ठाण्यात नेले. तिघांविरुद्ध मुलीच्या काकूच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहा व्हिडीओ :
पीडित १५ वर्षांची आदिती (नाव बदलले आहे) नववीत असून, ती बजाजनगरातील गोरख वाघ चौक परिसरात काका-काकूकडे राहते आणि इंग्रजी शाळेत शिकते. ती गोरख वाघ चौकातील खासगी कोचिंग क्लासेसमध्ये सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठपर्यंत जाते. नेहमीप्रमाणे तिच्या काकूने तिला सायंकाळी साडेपाचला क्लासला सोडले. रात्री साडेआठला क्लास सुटल्यानंतर त्या तिला घ्यायला आल्या. गाडीवर बसवल्यानंतर बाजूला थांबलेला एक टवाळखोर मुलगा तिला इशारे करत असल्याचे आदितीने काकूला सांगितले. काकूने त्याच्याकडे पाहिले असता तो चक्क आदितीला अश्लील इशारे करत होता. त्याच्यासोबत आणखी दोन टवाळखोर मुले होती. हा मुलगा नेहमी पाठलाग करतो व मला इशारे करून बोलण्याचा प्रयत्न करतो, आदितीने काकूला सांगितले. त्यामुळे तिची काकू गाडीवरून उतरून मुलांच्या दिशेने जाब विचारण्यासाठी गेली. त्यावर त्या मुलाने चक्क ती मला आवडते, असे म्हणून माझे नाव संतोष मंडाळे आहे. तुला काय करायचे ते कर, असे आदितीच्या काकूला धमकावले.
तेवढ्यावरच न थांबता त्याने तिच्या काकूलाही वाईट भावनेने जवळ ओढले. त्यामुळे काकूने आरडाओरड केली. टवाळखोरांचे मनाली कॉम्लेक्स येथे ए. के. मेन्स वेअर हे दुकान आहे. याच कॉम्प्लेक्समध्ये मानसिंग सोनवणे यांचे सलून आहे. तिथे प्रेमचंद प्रसाद बसलेले होते. सोनवणे आणि प्रसाद हे दोघेही आदिती आणि तिच्या काकूच्या मदतीला धावले. तेव्हा टवाळखोरांनी प्रेमचंद प्रसाद यांना शिवीगाळ केली. टवाळखोर अक्षय काळे (माजी ग्रा. पं. सदस्य मदन काळे यांचा मुलगा) याने त्याच्या हातातील कड्याने डोक्यात मारून आमच्यामध्ये आला तर तुला संपून टाकीन, अशी धमकी प्रेमचंद प्रसाद यांना दिली. मानसिंग सोनवणे यांनाही टवाळखोरांनी मारहाण केली. या आरडाओरड्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक जमले.
त्यांनी टवाळखोरांना चोप द्यायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्याच दुकानात कोंडून ठेवले आणि पोलिसांना कळवले. गोविंद, अक्षय काळे, संतोष मंडाळे अशी या टवाळेखोरांची नावे समोर आली. यावेळी २०० ते २५० लोकांचा जमाव जमला होता. घटनेबद्दल ऐकल्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला होता. कोणत्याही क्षणी दुकानातून काढून त्यांना जमाव मारहाण करण्याची शक्यता होती. यातूनही अनर्थही घडू शकत होता. मात्र वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे, पोलीस उपनिरिक्षक संदीप काळे, पोलीस अंमलदार राजाभाऊ कोल्हे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. जमाव एवढा आक्रमक होता, की दुकानात कोंडलेल्या युवकांना बाहेर काढणेही पोलिसांना अवघड होऊन बसले. त्यामुळे सौम्य लाठीमार करून गर्दीला पांगविल्यानंतर शटर उघडून दोन्ही युवकांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
अक्षय काढायचा दुसऱ्या एका १७ वर्षीय मुलीची छेड…
याच भागात आणखी एक १७ वर्षीय मुलगी राहते. तिची छेड अक्षय काळे हा काढत होता. अक्षय आणि त्याचे पाच-सहा मित्र या मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करून इशारे करत होते. अक्षय नेहमी तिच्या मागावर असायचा. गुरुवारी सायंकाळी सातला मुलगी आणि तिची आई घरी असताना अक्षय काळे हा मुलीच्या नावाने घराबाहेर जोराने ओरडत होता, असे मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. संतोष मंडाळे, अक्षय काळे, गोविंद हे तिघे दोन्ही अल्पवयीन मुलींना त्रास देत असल्याच्या तक्रारी समोर आल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास केला जात आहे.