छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : प्रेमाचा आठवडा मानल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाइन वीकमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर, जिल्ह्यातून तरुण मुलींनी घरातून पलायन करण्याचा उच्चांक गाठला आहे. ७ फेब्रुवारीपासून आज, १२ फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल २० तरुण मुली घरातून निघून गेल्या आहेत. त्या हरवल्याच्या तक्रारी त्यांच्या पालकांनी ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांत नोंदवल्या आहेत. अल्पवयीन मुलींच्या आकड्यानेही अर्धा डझनहून अधिक भर घातली आहे. पालकांना अलर्ट करणारी ही बातमी असून, अतिविश्वास आणि दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचे मत समाजातील सुज्ञ व्यक्त करत आहेत.
शहरातून १० तरुणी बेपत्ता…
पुंडलिकनगरमधून २७ वर्षीय तरुणी, मुकुंदनगरातून २१ वर्षीय तरुणी, नक्षत्रवाडीतून १८ वर्षीय तरुणी, रेणुकानगरातून २६ वर्षीय तरुणी, बेगमपुऱ्यातून २५ वर्षीय तरुणी, पवननगरातून २३ वर्षीय तरुणी, हर्सूलच्या राहाळपट्टी तांड्यातून १९ वर्षीय तरुणी, वडगाव कोल्हाटीतून २६ वर्षीय तरुणी, चिकलठाणा पुष्पा गार्डन भागातून २१ वर्षीय तरुणी, संजयनगर मुकुंदवाडीतून १९ वर्षीय तरुणी अशा एकूण १० तरुणी छत्रपती संभाजीनगर शहरातून गेल्या ५ दिवसांत बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांत दाखल झाल्या आहेत.
ग्रामीण भागात ९ तरुणींनी सोडले घर…
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथून २० वर्षीय तरुणी, पिशोरजवळील गणेशपूरमधून १८ वर्षीय तरुणी, गंगापूर शहरातून २० वर्षीय तरुणी, फुलंब्रीच्या मारसावळीतून २० वर्षीय तरुणी, बिडकीनमधून २५ वर्षीय तरुणी, शेंद्रा येथून २५ वर्षीय तरुणी, वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथून १९ वर्षीय तरुणी, खुलताबादच्या भांडेगावातून १९ वर्षीय तरुणी, फुलंब्रीतून २७ वर्षीय तरुणी अशा एकूण ९ तरुणींनी गेल्या ५ दिवसांत घर सोडले आहे.
कारणे काय?
तरुण मुलींनी घरातून पलायन करण्यामागची कारणे अनेक असली तरी प्रमुख कारण प्रेमप्रकरण असल्याचे समोर येते. याशिवाय घरच्यांशी झालेले मतभेद, त्यातून टोकाला गेलेला राग हेही कारण आहे. मनाविरुद्ध लग्न लावण्याचे प्रयत्नही कारणीभूत आहे. पालकांनी आपल्या पाल्याला विश्वासात घेऊन मैत्रीपूर्ण संवाद ठेवला पाहिजेत. अविश्वास ठेवण्यापेक्षा वेळच्या वेळी त्या कुणाच्या संपर्कात आहेत, कुणाशी बोलत असतात, वेळीच घरी येते का, तिचे मित्र कोण आहेत, याबद्दल चौकशी व्हायला हवी, असे मत सुजाणांकडून व्यक्त होत आहे.