छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : घाईगडबडीत तयार होत असताना मेकअप करणारी तरुणी बोलता बोलता स्कार्फला फिट ठेवणारी बॉलपिन गिळून बसली. त्यानंतर तिला प्रचंड वेदना सुरू झाल्या. त्यातच ती सहा महिन्यांची गर्भवती. त्यामुळे बाळाच्या जिवालाही धोका निर्माण झाला. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील पोटविकारतज्ज्ञ डॉ. चेतन राठी यांच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. डॉक्टरांनी एंडोस्कोपीद्वारे पिन काढली. तरुणीसह तिचे बाळही सुरक्षित राहिले. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
नक्की काय झाले?
सिल्लोड येथील २२ वर्षीय विवाहित तरुणीला एका कौटुंबिक कार्यक्रमाला जायचे होते. त्यासाठी ती घाईगडबडीत तयार होत होती. मेकअप करताना स्कार्फ फिट ठेवण्यासाठी लावली जाणारी बॉलपिन तोंडात ठेवली. त्याच अवस्थेत बोलता बोलता ती पिन गिळली गेली. ती थेट जठरात गेली. त्यामुळे तिला प्रचंड त्रास होऊ लागला. तिच्या रडण्याने घरातील सर्वच घाबरले. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगरला डॉ. चेतन राठींकडे आणण्यात आले. ६ महिन्यांची गर्भवती असल्यामुळे एक्स रे किंवा सीटीस्कॅन शक्य नव्हते. एंडोस्कोपीचा पर्याय देण्यात आला.
तिने जेवण केले असल्याने रात्रीच एंडोस्कोपी करता येणार नव्हती. सकाळी एंडोस्कोपी करण्याचा निर्णय झाला. मात्र यात बाळाच्या जिवाला धोका असल्याचे आधीच डॉक्टरांनी स्पष्ट केले. सोनोग्राफी करण्यात आली. बाळाचे ठोके व्यवस्थित आणि ते ठणठणीत होते. त्यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपी करून बॉलपिन बाहेर काढली. त्यानंतर पुन्हा सोनोग्राफी केली असता बाळ ठणठणीत होते. शौचावाटे पिन बाहेर आली नाही तर एंडोस्कोपी करण्यात येईल, असे डॉ. चेतन राठी यांनी सांगितले होते. १२ तास महिलेच्या पोटात पिन टोचत असल्याने ती रात्रभर रडत होती.