छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : अजिंठा नागरी सहकारी बँकेतील ९७.४१ कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपी, बँकेचा चेअरमन माजी आमदार सुभाष झांबड याने शुक्रवारी (७ फेब्रुवारी) सकाळी आत्मसमर्पण केले. मात्र त्याआधी अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयाचे उंबरठे अगदी जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत झिजवले. केवळ न्यायालयीन प्रक्रियाच नाही, तर सत्तेचा वरदहस्त मिळविण्याचाही त्याने प्रयत्न केला. त्यासाठी भाजपात प्रवेश करण्याचे प्रयत्न केले. मंत्र्यांच्या माध्यमातून थेट मुंबईत प्रदेश कार्यालयातील वरिष्ठांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र भाजपने त्याला थारा दिला नाही. त्यामुळे त्याचे मनसुबे उधळले गेले. विशेष म्हणजे, अद्यापही झांबडला काँग्रेसने मात्र पक्षातच ठेवले आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी केलेली नाही, हे विशेष.
क्रांती चौक पोलिसांनी या घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर झांबड १८ ऑक्टोबर २०२३ पासून फरारी होता. यादरम्यान भाजपमध्ये गेल्यास आपल्यावरील कारवाईचे संकट टळू शकते, एव्हाना पुढे ढकलले जाऊ शकते, याची कल्पना झांबडला आली होती. त्याने भाजपमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली मदत होईल असा दावा करत प्रवेशाची गळही घातली. पण भाजपच्या वरिष्ठांनी एकूणच घोटाळ्याचे गांभीर्य पाहता प्रवेश देणे टाळले. त्यामुळे त्याची डाळ शिजलीच नाही, असे भाजपच्या सूत्रांकडून समजले. विशेष म्हणजे, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी झांबडला प्रवेश न देण्याची भूमिका वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती.
काँग्रेसने का टाळली हकालपट्टी?
बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट सोसायटीचा सर्वेसर्वा सुरेश कुटे यानेही भाजपात प्रवेश केला होता. मात्र या पतसंस्थेतील घोटाळा समोर आल्यावर एकाच दिवसात भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्याची हकालपट्टी केली. दुसरीकडे सुभाष झांबड मात्र अद्यापही काँग्रेसमध्येच आहे. काँग्रेसने त्याची हकालपट्टी न करता अभय का दिले, याबद्दल सध्या शहरात चर्चा होत आहे. सध्या झांबड १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
काय आहे घोटाळा?
प्रशासकांना अजिंठा बँकेच्या लेखा परीक्षणात नेटवर्थ रक्कम व सीआरएआर (भारित मालमत्ता प्रमाण) मध्ये मोठा फरक, तसेच ३६ कर्जदारांना ६४ कोटी ६० लाखांचे असुरक्षित कर्ज वाटप केल्याचे आढळले. बेकायदा कर्ज वाटप, इतर बँकांतील ठेवीच्या खोट्या नोंदी, खोटे ताळेबंद प्रमाणपत्र आणि आरबीआयला पाठविण्यात आलेला खोटा लेखापरीक्षण अहवाल या मुद्यांवरून प्रशासकांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच झांबड अटकेच्या भीतीने फरारी झाला होता. झांबडने अटकपूर्व जामिनासाठी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालय, नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे अटक होण्याशिवाय त्याच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. अखेर त्याने शुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात येत आत्मसमर्पण केले.