छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे वाहन पकडले म्हणून स्वतःला पोलीस कर्मचारी असल्याचे सांगणाऱ्या पवार नावाच्या वाळू माफियाने तहसीलदार रमेश मुंडलोड यांना शिवीगाळ करून धमकावले, अरेरावी केली. त्याच्याविरुद्ध कारवाईसाठी जिन्सी पोलीस ठाणे गाठले असता तिथल्या अधिकाऱ्यांनीही पवारलाच साथ दिली व उलट तहसीलदारांचीच गाडी जप्त केल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्या दिवशी जो धक्कादायक प्रकार घडला, त्याची लेखी तक्रार तहसीलदारांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. विशेष पोलीस महानिरीक्षकांनाही पत्र लिहिणार असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले आहे.
काय म्हटलंय पत्रात…
जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी म्हटले आहे, की ६ फेब्रुवारी रोजी रात्री १०. वा. मी रमेश मुंडलोड, तहसीलदार (छत्रपती संभाजीनगर) शासकीय काम व काही राजशिष्टाचाराची कामे आवरून घराकडे जात असताना विजय चौक गारखेडा परिसर येथे एक वाळूने भरलेला हायवा आढळला. वाळू वाहतुकीबद्दल चालकाला विचारणा केली असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितले. पवार नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याची गाडी असल्याचे त्याने सांगितले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना बोलावून हायवा जप्त करून मी तहसील कार्यालयाकडे येत असताना पोलीस अधीक्षक कार्यालयाशेजारी पवार व त्याच्या साथीदारांनी माझी गाडी थांबवली. मला अरेरावीच्या भाषेत पवारने तो स्वतःला पोलिस कर्मचारी आहे म्हणत होता, त्याने शिवीगाळ सुरू केली.
१०० ते १५० वाळू माफियांना जमा करून त्याने मला धमकाविण्याचा प्रयत्न करून वाळूने भरलेला हायवा पळवून नेला. पवारने सांगितले, की मी पोलीस कर्मचारी असून मी सर्व पोलीस स्टेशनला काम केले आहे. माझ्याविरुद्ध कुठल्याही पोलीस स्टेशनला कारवाई होणार नाही, मला कुणी काही करू शकत नाही. त्यानंतर मी पवारविरुद्ध तक्रार करण्यासाठी जिन्सी पोलीस ठाण्यात गेलो असता अगोदरच पवार आणि त्याचा मुलगा, सोबतचे शंभर ते दीडशे वाळूमाफिया अगोदरच पोलीस ठाण्यात हजर होते. तिथल्या पोलीस उपनिरीक्षकांना मी घडलेल्या घटनेची माहिती दिली. मात्र पवार हा पोलीसच असल्याने अधिकाऱ्यांनी तक्रारीची नोंद न घेता पवारलाच साथ दिली.
उलट माझ्याच गाडीची चावी काढून घेऊन पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. मध्यरात्री १ पर्यंत जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार घेतली नाही. मी कार्यालयाची गाडी परत करण्याची विनंती केली असता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सांगितले, की तुमची गाडी अवैधरित्या फिरत होती म्हणून आम्ही जप्त केली आहे. मी पथकातील कर्मचाऱ्याच्या खासगी वाहनाने घरी आलो. आजही माझ्या कार्यालयाचे वाहन क्र. एमएच २०, जीक्यू ००५४ पोलीस ठाण्यातच जमा आहे. मला धमकावून वाद घालणे, पोलिसांनी वाळूमाफियांना साथ देत माझ्यावरच वेगवेगळे आरोप करणे ही बाब शासकीय कामकाजाच्या दृष्टीने खेदजनक आहे. तालुका दंडाधिकाऱ्यांशी त्यांची वर्तणूक योग्य नसल्याने संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध आपल्यास्तरावरून कारवाई करावी, असे पत्रात मुंडलोड यांनी म्हटले आहे.
वाळूमाफियांविरुद्ध मुंडलोड लढाई
तहसीलदार रमेश मुंडलोड हे कायम अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाया करत असतात. यापूर्वीही त्यांच्या धडाकेबाज कारवाया चर्चेत आल्या आहेत. काही कारवायांदरम्यान वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्लाही केला आहे.
Comments 1