बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या ऐतिहासिक चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यापूर्वी विकीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात येऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. मंदिरात विधीनुसार पूजा करण्यात आली.
पहा व्हिडीओ :
छावामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. यात रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी व्हॅलेंटाईन डेला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित आहे. विकी कौशलने घृष्णेश्वर मंदिरात शिवपूजा करत त्याच्या छावा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. विकीने या भूमिकेसाठी कशी तयारी केली हेही यावेळी सांगितले. तो म्हणाला, की बायोपिकसाठी फक्त एका अभिनेत्यालाच नाही तर संपूर्ण टीमला खूप तयारी करावी लागते.
ऐतिहासिक विषयावर काम करणे खूप आव्हानात्मक असते. कारण बजेट खूप मोठे असते आणि पडद्यावर एका वेगळ्याच युगाचे सादरीकरण करावे लागते. एक अभिनेता म्हणून, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयारी करावी लागते. यामध्ये कृती प्रशिक्षण, शरीरसौष्ठव प्रशिक्षण आणि इतिहासावरील संशोधन समाविष्ट आहे, कारण तो काळ समजून घेणे महत्त्वाचे आहे. दरम्यान, विकी पुढच्या काळात महावतार या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये तो परशुराम ऋषींची भूमिका साकारणार आहे. भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरित हा चित्रपट २०२६ च्या ख्रिसमसला थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. छावा चित्रपट लेखक शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. विकी आणि रश्मिका यांच्याशिवाय अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, डायना पेंटी यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.