छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यातील भारतमातेच्या पूजेवर बंदी घालण्यावरून गेल्या आठवड्यात मोठा कोलाहल माजला होता. राज्य सरकारने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. त्यावर पुरातत्व खात्याने अशी कोणतीही बंदी घातलेली नाही असे पत्राद्वारे कळवल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान परिषदेत दिली.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद सभागृहात हा उपस्थित केला तेव्हा अशी कुठल्याही प्रकारची बंदी नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. देवगिरी किल्ल्यावर विविध टप्प्यांवर मंदिरे उभारली गेली. भारतमाता मंदिरासह पेशव्यांनी उभारलेले संकट विनायक गणेश मंदिर व जनार्दन स्वामी महाराजांची समाधीदेखील श्रद्धेचा विषय आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामादरम्यान १९५० मध्ये स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेची मूर्ती उभारली होती. काही दिवसांपूर्वी एका पुजाऱ्याने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणकडे पूजेसाठी परवानगी मागितली तेव्हा हा किल्ला एक ‘नॉन लिव्हिंग’ स्मारक श्रेणीत असल्याने स्मारक परिसरातील कोणत्याही मंदिरात पूजा, अर्चना करण्यास परवानगी देणे हे नियमाचे उल्लंघन असल्याचे म्हणत खात्याने परवानगी नाकारली होती. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
खासदार संदीपान भुमरे यांनीही केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेऊन विभागाचा २४ जून रोजीचा पूजेवर निर्बंध घालणारा निर्णय रद्द करण्यासाठी विनंती केली. हा निर्णय चुकीचा असून, या किल्ल्यातील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मंडळाच्या स्थापनेपूर्वीची असल्याचे भुमरे यांनी म्हटले होते. बंदी नसल्याचे स्पष्ट झाल्याने पूजेचा मार्ग मोकळा झाल्याने भाविकांत समाधान व्यक्त होत आहे. वरिष्ठ स्तरावरून बंदी नाहीतर मग स्थानिक अधिकाऱ्यांनी मनमानी केली का, असाही प्रश्न यातून निर्माण झाला आहे.