छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : वाळूज एमआयडीसीतील बजाजनगरात राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुरुवातीला लग्नाचे आमिष दाखवत, तर नंतर सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणाने वारंवार बलात्कार केला. नंतर मात्र दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न उरकले. ही बाब कळताच तिने जाब विचारला असता त्याने कुटुंबीयांनी इच्छेविरुद्ध लग्न लावून दिल्याचा बनाव केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी (४ जुलै) गुन्हा दाखल केला आहे.
पंकज प्रशांत गंगवाल (वय २९, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे संशयिताचे नाव आहे. त्याचे किराणा दुकान आहे, तर तरुणी ही आई व भावासोबत मिळून खानावळ चालवते. किराणा सामान आणण्यासाठी ती पंकजच्या दुकानात नेहमी येत होती. यातून तिची पंकजसोबत ओळख झाली. ओळखीतून मैत्री आणि नंतर पंकजने तिला प्रेमाची मागणी घातली. तिनेही त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. सहा वर्षांपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. काही दिवसांपूर्वी पंकज तिला पडेगाव परिसरातील एका हॉटेलवर घेऊन गेला. तिथे त्याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर याच हॉटेलमध्ये अनेक वेळा नेऊन त्याने तिचा उपभोग घेतला.
लग्नासाठी तगादा…
शारीरिक शोषण होत असताना पंकज लग्नाचे नाव घेत नसल्याने तिने याबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा तो टाळू लागला. तिने लग्नासाठी तगादा लावला असता त्याने माझ्या बहिणीचे लग्न झाल्यावर आपण लग्न करू, असे सांगितले. त्यानंतरही तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवतच होता. धक्कादायक बाब म्हणजे, पंकजने ८ महिन्यांपूर्वी दुसऱ्या तरुणीसोबत लग्नही उरकून घेतले. लग्न होऊनही तो तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवतच होता. त्याने दुसऱ्या तरुणीसोबत लग्न केल्याची माहिती तरुणीला कळली तेव्हा तिला धक्काच बसला. तिने त्याला याबाबत विचारले असता माझ्या कुटुंबीयांनी इच्छेविरुद्ध माझे लग्न लावून दिल्याचा बनाव त्याने केला.
…म्हणे पत्नीला सोडून देतो!
गेल्या ९ जूनलाही पंकज तरुणीला घेऊन पडेगावच्या हॉटेलमध्ये गेला होता. तरुणीने त्याला त्याच्या लग्नाबद्दल विचारले असता त्याने पत्नीला सोडून देतो व तुझ्याशी लग्न करतो, असे खोटे बोलून पुन्हा तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. नंतरच्या काळात तरुणी सतत त्याला लग्नाचे विचारत असल्याने त्याने चक्क नकार दिला. तुला काय करायचे ते कर, तू पोलीस ठाण्यात तक्रार दिलीस तर तुझ्यासोबत काढलेले फोटो व्हायरल करून नातेवाईकांना पाठवून देईन, अशी धमकी त्याने दिली. फसवणूक झाल्याचे तरुणीच्या लक्षात आले. तिने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.
वैजापूरमध्ये शेतात काम करणाऱ्या युवतीसोबत अश्लील चाळे…
वैजापूर : शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या प्रवीण ऊर्फ भावड्या जालिंदर गायकवाड (रा. महालगाव) याच्याविरुद्ध विरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रवीण वैजापूर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या २६ वर्षीय विवाहितेच्या शेतात गुरुवारी (४ जुलै) दुपारी गेला. त्यावेळी विवाहिता शेतात काम करत होती. प्रवीणने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. विवाहितेच्या तक्रारीवरून प्रवीणविरुद्ध विरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.