जालना (अरविंद देशमुख : सीएससीएन वृत्तसेवा) : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून (६ जुलै) मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली काढणार आहेत. हिंगोलीपासून सुरू होणाऱ्या रॅलीचा समारोप छत्रपती संभाजीनगरात १३ जुलैला होणार आहे.
रॅलीबद्दल माहिती देताना जरांगे पाटील म्हणाले, की आता मराठवाडा आणि नंतर राज्यांतील सर्व भागात रॅली निघणार आहे. मराठ्यांना घराबाहेर पडल्याशिवाय न्याय मिळणार नाही. सर्वांनी रॅलीत सहभागी व्हावे. हे शक्तिप्रदर्शन किंवा निवडणुकीचा विषय नाही, तर आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले. शांतता रॅलीत घुसून गालबोट लावण्याचा प्रयत्न होईल, अशी भीती व्यक्त करत सरकारने बारीक लक्ष ठेवावे, असे ते म्हणाले. ओबीसी नेत्यांना राजकीय स्वार्थासाठी विरोध करण्याची सवय लागल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठा आरक्षण विषयाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्यावरही त्यांनी टीका केली. मराठा आरक्षणाचे मारेकरी हेच लोक आहेत की काय अशी शंका येत असून सराटे यांची पार्श्वभूमी बघितली तर हे सत्ताधारी पक्षाचेच आहेत, असे जरांगे म्हणाले. सगेसोयऱ्यांची मागणी केवळ जरांगे करत असून, ही मागणी त्यांच्या डोक्यात कोणी घातली हे माहिती नसल्याचे वक्तव्य बाळासाहेब सराटे यांनी केले होते. त्यामुळे जरांगे यांनी सराटे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सराटे यांनी अंतरावाली सराटीत येऊन चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.