फुलंब्री (सीएससीएन वृत्तसेवा) : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सासऱ्याने बलात्कार केल्याची घटना फुलंब्री पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात समोर आल्याने खळबळ उडाली. २५ डिसेंबरला घटना घडली होती, २० जानेवारीला या प्रकरणात फुलंब्री पोलिसांत तक्रार आली. त्यावरून नराधम सासऱ्यासह पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनकर संपत कदम असे संशयिताचे नाव आहे.
दिनकर कदम याने ओळखीच्या ४५ वर्षीय विधवेकडे स्वतःच्या मुलासाठी तिच्या मुलीला मागणी घातली. तुझ्या मुलीचे माझ्या मुलासोबत लग्न लावून दे, असे म्हटल्यावर महिलेने मुलगी १४ वर्षांचीच असल्याने सुरुवातीला नकार दिला. मात्र ९ जून २०२४ रोजी दिनकर तिच्या गावात गेला. धमकी देऊन त्याने अल्पवयीन मुलीचे त्याचा मुलगा समाधानसोबत लग्न लावून घेतले. समाधान हा छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला जातो.
त्या दिवशी काय घडलं…
२५ डिसेंबरला सायंकाळी अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना दिनकरने तिच्यावर बलात्कार केला आणि सासरा-सुनेच्या नात्याला कलंक फासला. मुलीने घाबरून कुणाला काही सांगितले नाही. मात्र २० जानेवारीला आईकडे आल्यावर तिने घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या आईने मुलीसह फुलंब्री पोलीस गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सासरा दिनकर, पती समाधान व सासू चंद्रकला यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दिनकर व समाधानला अटक केली असून, मंगळवारी (२१ जानेवारी) फुलंब्री न्यायालयाने दोघांची हर्सूल कारागृहात रवानगी केली.