छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : कायद्याचा गैरवापर करून एका ज्येष्ठाला छळल्या प्रकरणी हर्सूल पोलिसांनी एका पोलीस उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध सोमवारी (२० जानेवारी) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन कामे आणि पोलीस कॉन्स्टेबल अंकुश शेषराव दौड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दत्तात्रय पांडुरंग ठोंबरे यांनी तक्रार दिली.
ठोंबरे हे बजाज कंपनीतून सेवानिवृत्त झालेले आहेत. ते हर्सूलमधील छत्रपती हॉलमागे अमरनाथ हौसिंग सोसायटीत राहतात. त्यांच्या घरासमोर पोलीस कॉन्स्टेबल अंकुश दौड यांचा प्लॉट आहे. ते कायद्याचा दुरुपयोग करून गल्लीतील महिला, ज्येष्ठांना ठोंबरे यांच्याविरुद्ध भडकवतात. त्यांच्या सांगण्यावरून शेजारील एका महिलेने ठोंबरे यांच्याविरुद्ध खोटी विनयभंगाची तक्रारही दिल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे. या गुन्ह्यात दौड यांनी खोटी माहिती दिल्याने पोलीस उपनिरीक्षक नितीन कामे यांनी घरात घुसून ठोंबरे यांना पत्नी व लहान मुलासमोर बेदम मारहाण केली.
शिवीगाळ करत पोलीस व्हॅनमध्ये बसवून गाडीतही बेदम मारहाण केली. या मारहाण प्रकरणी मेडिकल मेमो घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता ठोंबरे यांना मेडिकल मेमो देण्यात येऊ नये म्हणून कामे यांनी प्रयत्न केले. पण तरीही मेडिकल मेमो मिळाला आणि त्याचा अहवाल पोलीस ठाण्याला मिळाला. अंकुश दौड व नितीन कामे यांच्याविरोधात पोलीस आयुक्तांकडे ठोंबरे यांनी दाद मागितली. पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. त्यामुळे नितीन कामे आणि दौड यांचे धाबे दणाणले. त्यांनी या प्रकरणात मारहाण झाली नाही, असे खोटेच ठोंबरे यांच्याकडून लिहून घेतले. तरीही या प्रकरणात आता कामे आणि दौड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाचा तपास प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सचिन पागोटे यांच्याकडे आल्याने आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.