छत्रपती संभाजीनगर (दिव्या पुजारी : सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात राजकीय संघर्ष आता पेटला आहे. कुणाच्या मनीध्यानी नसलेला हा संघर्ष विधानसभा निवडणूक होताच उफाळून आला आणि आता धग वाढली आहे. मी निवडून आलो तर मंत्री होईल म्हणून माझ्याविरोधात काम केले ते समजू शकतो. पण कन्नडमधून संजना पडली पाहिजेत म्हणून प्रयत्न केले. कशाला राजकारण करता. माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही, असा इशारा एकीकडे देतानाच, मंत्री शिरसाटांनी २६ जानेवारीनंतर जिल्हा नियोजन समितीची काही चुकीची कामे रद्द करणार असल्याचे सांगितल्याने सत्तारांचे धाबे दणाणले आहेत.
संजय शिरसाट हे मंत्री होताच त्यांनी अब्दुल सत्तारांवर तोफ डागली होती. त्यानंतर सत्तार यांनीही छत्रपती संभाजीनगरात स्वतःच्या वाढदिवसाचा भव्य-दिव्य सोहळा घेत शक्तीप्रदर्शन केले. हा वाद शांत होईल असे वाटत असताना शिरसाट हे सत्तारांना इतक्यात सोडणार नाहीत, असे आता दिसून येत आहे.
सत्तारांकडून कामांचे असमान वाटप…
विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार हे पालकमंत्री असताना त्यांनी जनसुविधेची कामे आपल्याच मतदारसंघात जास्त खेचली. सिल्लोड-सोयगावात २६ कोटींच्या २६० कामांपैकी १३४ कामे त्यांनी आपल्या मतदारसंघात नेली. जिल्हा नियोजन समितीतून (डीपीसी) १ एप्रिलपासून ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ६६० पैकी ५०८ कोटींच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली. त्यातील सुमारे २५० कोटींच्या वर्कऑर्डर संबंधित विभागांनी दिल्या असून, २५० कोटींच्या वर्कऑर्डर अंतिम टप्प्यात आहेत. संजय शिरसाट यांनी यातील अतिरिक्त कामांबाबत आक्षेप घेतल्याने ती सगळी कामे संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहेत. शिरसाट म्हणाले, की जिल्हा नियोजन समितीने समान निधी वाटप केलेला नाही. काही चुकीच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचे कळले आहे. जनतेच्या पैशांचा असा अपव्यय होऊ देणार नाही. कामे काही ठेकेदारांनी रिंग करून घेतल्याची माहिती आहे. या ठेकेदारांवर गुन्हे नोंदविण्याचा मानस आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.
रावसाहेब दानवेंची लढाई शिरसाट हाती घेणार…
अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दानवेंच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला हातभार लावणाऱ्या सत्तारांविरुद्ध दानवे यांनीही विधानसभा निवडणुकीत कंबर कसली. अगदी निसटत्या मतांनी सत्तार विजयी झाले. मात्र सिल्लोडमधील भाजप कार्यकर्ते विरोधात आहेत म्हणून सत्तारांनी कन्नडमधील शिंदे गटातील काही पदाधिकाऱ्यांना संजना जाधव यांच्या विरोधात उचकवले होते. केवळ संजना जाधव यांच्या विरोधातच नाही तर संजय शिरसाट निवडून आले तर मंत्री होतील म्हणून त्यांच्याही विरोधात सत्तारांनी फिल्डिंग लावल्याचे आता शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे समोर आले आहे. आपल्याला मंत्री करू नये म्हणून एकाने शिंदे यांना व्हॉट्स ॲप मेसेज पाठवला होता, असा गौप्यस्फोट करून शिरसाट म्हणाले, की मी वरिष्ठ आमदार असल्याने मंत्री होईल म्हणून माझ्या विरोधात काम केले ते समजू शकतो. पण संजना पडली पाहिजेत म्हणून प्रयत्न केले. माझ्या नादाला लागाल तर सोडणार नाही. मी पाच वर्षे पालकमंत्री राहील. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतो तुम्हाला दाखवतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
गुंडांना धोपटा…
कोणी गुंड समाजसेवक म्हणून वावरणार असेल तर ते खपवून घेणार नाही. पोलिसांना धाक निर्माण व्हावा यासाठी गुंडांना धोपटण्याचे निर्देश मंत्री शिरसाटांनी दिले. शहरातील पोलिसांना २० नव्या स्कॉर्पिओ देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. १० हून अधिक माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांचा शिवसेनेत २३ जानेवारीपूर्वी प्रवेश होणार आहे, असे शिरसाट म्हणाले. बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शिरसाट यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शिंदे गटातर्फे सोमवारी (२० जानेवारी) रात्री संत एकनाथ रंगमंदिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. आ. प्रदीप जैस्वाल, आ. संजना जाधव, माजी आमदार कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, पृथ्वीराज पवार, शिल्पाराणी वाडकर, विजया शिरसाट, हर्षदा शिरसाट यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.