छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रसिद्ध कॉम्प्युटर व्यावसयिक राजेश दिलीप गोरवाडकर ऊर्फ राजन मंदा (वय ४६, रा. रोकडा हनुमान कॉलनी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (२० जानेवारी) सकाळी अकराला समोर आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली. मानसिक व शारीरिक आजाराला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास पत्नीला मी रूममध्ये जाऊन मेडिटेशन करतो, असे म्हणत ते रूममध्ये गेले. बराच वेळ होऊनही बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा वाजवला. मात्र आतून प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर दरवाजा तोडून पाहिले असता गळफास घेतल्याचे दिसले. क्रांती चौक पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह घाटी रुग्णालयात नेण्यात आला.
सुसाइड नोटमध्ये मित्रांना विनंती करत परिवाराला सांभाळून घेण्याचे सांगत, आई, वडील, पत्नी, भाऊ यांची माफी मागितली. पोलिसांनी कुटुंबाला बिलकुल त्रास देऊ नये, अशी विनंती केली. आतापर्यंत स्वाभिमानाने जगलो. थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत कविता गाजवल्या. पण तब्येत आडवी आली. माझे तुमच्यावर ओझे होईल. नैराश्याने काहीही करावे वाटत नाही. उमंग, हर्षोल्हास सर्व नाहीसे झाले असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास केला जात आहे.