छत्रपती संभाजीनगर (सीएससीएन वृत्तसेवा) : गुजरातच्या क्विक स्टार्ट २४ ग्रुपच्या घोटाळ्यानंतर छत्रपती संभाजीनगरात आणखी एक घोटाळा समोर आला आहे. मे. ऐंजल-१ ब्रोकिंग कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून नात्यातीलच २४ जणांना पती-पत्नीने २२ लाख रुपयांना गंडवले. चुलत दिराच्या तक्रारीवरून वहिनी, चुलत भाऊ, वहिनीची आई आणि भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा सातारा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पूजा अशोक सुखधान, तिचा पती ऋषिकेश मिलिंद जाधव, पूजाची आई छाया सुखधान आणि भाऊ राहुल सुखधान (सर्व रा. सूर्यकिरण अपार्टमेंट, जालाननगर, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अमोल संजय जाधव (रा. गल्ली नंबर ९, सादातनगर) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. फेब्रुवारी २०२३ मध्ये ऋषिकेश, पूजा हे अमोलच्या घरी आले. त्यांनी मे. ऐंजल-१ कंपनीत स्टॉक मार्केटमध्ये पूजा कामाला आहे. तिच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास दोन महिन्यांतच दोन लाख रुपये परतावा मिळतो, असे त्यांनी सांगितले. काही तोटा झाल्यास जबाबदारी आम्हा दोघांची, असा शब्दही त्यांनी दिला. चुलत भावाचीच बायको असल्यामुळे अमोलसह त्याच्या कुटुंबीयांनी विश्वास ठेवला.
पूजाची आई छाया सुखधान हिनेही गुंतवणुकीचा आग्रह धरला होता. अमोलच्या आईने सुरुवातीला १० हजार रुपये रोख पूजा व ऋषिकेशकडे दिले. त्यांनी २७ दिवसांनंतर २२ हजार रुपये परत केले. त्यामुळे अमोल आणि त्याच्या कुटुंबीयांचा आणखीनच विश्वास बसला. त्यांनी गुंतवणुकीसाठी १४ जून २०२४ रोजी २२ लाख रुपये दिले. पूजा सुखधान हिने इशान स्टॉक मार्केटतर्फे करारनामा करून दिला. त्यात २२ लाख रुपये एक महिन्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी असल्याचेही नमूद केले होते. मात्र परतावा तर दूरच पण मुद्दलही परत करण्यास पूजा व ऋषिकेशने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक केल्याचे समोर आल्यानंतर अमोल यांनी आर्थिक गुन्हे शाखेत धाव घेतली. चौकशीअंती सातारा पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.